माथेरानच्या हिरव्या टेकडीवर आढळणारे फुलपाखरू प्रथमच मुंबईत
महाराष्ट्रातील हिरव्यागार टेकडय़ा आणि त्यातही अगदी जवळच्या माथेरानच्या डोंगरदऱ्यांमध्ये स्वच्छंदपणे विहार करताना आढळणाऱ्या ‘ब्लॅक प्रिन्स’ जातीचे एक फुलपाखरू चक्क मुंबईत भरकटले. अत्यंत कोलाहल आणि गोंगाटासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गाच्या अगदी लगोलग ताठ मानाने उभ्या असणाऱ्या मालाडच्या वृंदावन सोसायटीत ‘ब्लॅक प्रिन्स’ हे फुलपाखरू आढळले आहे. फुलपाखरू अभ्यासक रेखा शहाणे यांना हे फुलपाखरू आढळले असून मुंबईत प्रथमच या फुलपाखराची नोंद झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई व उपनगरात तब्बल १५० फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. पण ब्लॅक प्रिन्स हे मुंबईत कधीच आढळले नव्हते. हे फुलपाखरू महाराष्ट्रात आढळते आणि मुंबईच्या जवळपास म्हटले तर माथेरानलाही आढळते. अतिशय जलदगतीने उडणाऱ्या ‘ब्लॅक प्रिन्स’च्या पंखांचा विस्तार साधारण ४५ ते ५० मिमी आहे. हिरव्यागार टेकडय़ावर साधारण ६०० ते १८०० मीटर उंचीपर्यंत एप्रिल ते डिसेंबर महिन्याच्या काळात उडताना आढळते. परंतु, रेखा शहाणे यांना हे फुलपाखरू चक्क मालाडच्या भरवस्तीत बागडताना आढळून आले.
‘पहिल्यांदाच आमच्या सोसायटीत ‘ब्लॅक प्रिन्स’ दिसले. तेव्हा माझा त्यावर विश्वास बसेना. मात्र नंतर काही दिवसांनी बटरफ्लाय मॅन आयझॅक किहीमकर यांनी जेव्हा खात्री दिली की तुम्हाला आढळलेले फुलपाखरू हे ‘ब्लॅक प्रिन्स’ असून ही मादी आहे. तेव्हा प्रचंड आनंद झाला. तेव्हापासून याचे लाव्र्हल फूड प्लांट आसपास कुठे आहे याचा शोध घेणे सुरू झाले. परंतु मुंबईत हे काम सोपे नाही. त्याचा शोध घेणे अजूनही चालूच आहे,’ असे रेखा शहाणे यांनी सांगितले.
‘ब्लॅक प्रिन्स’चा थाट
’ या फुलपाखराचा नर मखमली काळ्याभोर रंगाचा असतो. या फुलपाखराच्या उघडलेल्या पंखावरचा पांढरा ठिपका सोडला (एपिकल व्हाइट डॉट्स) तर बाकी रंग मखमली काळा असतो. आणि खालच्या पंखांवर निमुळत्या टोकाना तांबूस पिवळ्या रंगाची रेशा असते.
’ ‘ब्लॅक प्रिन्स’ची मादी अगदी वेगळी दिसते. तिच्या रंगात तांबूस पिवळसर छटा असते. आणि वरच्या पंखावरचा डिस्कल बॅण्ड थोडा फिकट रंगाचा असतो.