प्राचार्यपदाच्या वादाला वेगळे वळण; लिंबू-मिरच्या आढळल्याने खळबळ
अंधश्रद्धामुक्त समाजाच्या निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयात जादूटोणा व करणीच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. प्राचार्यपदाच्या वादातून असे प्रकार केले जात असल्याचे सांगण्यात येते. या साऱ्या प्रकाराने महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वैतागून गेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब व उपेक्षित समाजातील मुला-मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेचे मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय आहे. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून पीपल्सवर ताबा मिळविण्यासाठी आंबेडकरी नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.
या वादातून एका गटाने प्राचार्य कृष्णा पाटील यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी यू. एम. मस्के यांची नियुक्ती करण्यात आली. त्याला विरोधी गटाने आव्हान दिले. या वादात प्राध्यापकांचे व कर्मचाऱ्यांचे अनेक महिने वेतन रखडले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही अडकून पडली. चार-चार, सहा-सहा महिने प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्याने महाविद्यालयात असंतोषाचे, तणावाचे व संघर्षांचे वातावरण आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर कायम पोलीस बंदोबस्त व पोलीस व्हॅन उभी असते. त्यामुळे मागासवर्गीय पालक आपल्या मुलांना या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास तयार नाहीत, असे एका वरिष्ठ प्राध्यापकाने निदर्शनास आणले.
आता प्राचार्यपदाच्या वादाला वेगळेच वळण लागले आहे. दोन दिवसांपूर्वी प्राचार्य मस्के यांनी त्यांच्या दालनात प्रवेश केला, त्या वेळी त्यांना आत कुणी तरी लिंबू, मिरच्या टाकल्याचे दिसले. हा जादूटोणा वा करणीचा प्रकार आहे, असे तेथील काही प्राध्यापकांनी सांगितले. या संदर्भात मस्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्या दालनात लिंबू-मिरच्या आढळल्याचे सांगितले. परंतु त्यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. मात्र या प्रकाराने प्राध्यापक व कर्मचारी वैतागून गेले आहेत.
प्राध्यापकांना खंत..
बाबासाहेब आंबेडकरांनी समाज अंधश्रद्धेतून मुक्त व्हावा, समाजात बुद्धिवाद व विज्ञानवाद रुजावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले, विचार मांडले, चळवळी केल्या आणि आता त्यांच्याच महाविद्यालयात जादूटोणा-करणी करणे, असले अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडत असल्याबद्दल काही प्राध्यापकांनी खंत व्यक्त केली.