कोल्हापूरच्या अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात कॉ. गोविंद पानसरे यांची प्रकृती स्थिर होती. मात्र मुंबईत मोठय़ा रुग्णालयात उत्तम उपचार मिळतील या विचाराने त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलविण्यात आले. तेव्हाही त्यांची प्रकृती स्थिर होती. पण गोळीबारामुळे निकामी झालेल्या फुप्फुसात रक्तस्राव होऊ लागला आणि घात झाला.. रक्तस्रावामुळे कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी दुसरी नळी बसविण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि कॉ. पानसरे यांचे प्राण वाचविता आले नाहीत, अशी खंत जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.
गेल्या सोमवारी अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा गंभीर जखमी झाले. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळी लागल्यामुळे पानसरे यांचे फुप्फुस निकामी झाले होते. कोल्हापूरऐवजी मुंबईतील मोठय़ा रुग्णालयात आणखी उत्तम उपचार मिळू शकतील, या भावनेने अ‍ॅस्टर आधार रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात कॉ. पानसरे यांना हलविण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने तात्काळ हालचाली केल्या आणि कॉ. पानसरे यांना ब्रीच कॅण्डीमध्ये दाखल करण्यावर शिक्कामोर्तब झाले. कॉ. पानसरे यांना कोल्हापूरहून घेऊन निघालेली हवाई रुग्णवाहिनी शुक्रवारी सायंकाळी ५.४० च्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाली. त्यानंतर रुग्णवाहिनीतून त्यांना ६.४५ च्या सुमारास ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आणण्यात आले. त्या वेळी अनेक नामांकित डॉक्टर आणि अ‍ॅस्टर आधार रुग्णालयातील डॉ. केणी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हजर होते. वैद्यकीय तपासणीत कॉ. पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या उजव्या फुप्फुसाला सूज होती. मात्र प्रकृती स्थिर असल्यामुळे रात्री ८ च्या सुमारास आपण रुग्णालयातून निघालो, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. रात्री पावणेदहा-दहाच्या दरम्यान फोन आला आणि कॉ. पानसरे यांची प्रकृती ढासळल्याचे समजले. तात्काळ मी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात धाव घेतली. तोपर्यंत डॉक्टर मंडळी प्रयत्नांची शर्थ करीत होते. फुप्फुसात रक्तस्राव झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी बसविलेली नळी बदलण्याची गरज होती. मात्र दुसरी नळी बसविता येत नव्हती. डॉक्टरांनी कॉ. पानसरे यांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि अखेर पावणेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, असे डॉ. लहाने म्हणाले.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनाने एक लढवय्या नेता आणि पुरोगामी विचारवंत आपण गमावला आहे.
पानसरे यांनी समाजाच्या तळागाळातील नागरिकांसाठी दिलेले योगदान आणि लढा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. विविध चळवळींच्या माध्यमातून श्रमिक वर्गाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी गेल्या ४० वर्षांपासून अविरत परिश्रम घेतले. कोल्हापुरातील टोलच्या विरोधातील आंदोलनात ते अग्रेसर होते. विविध चळवळींचे ते खरेखुरे आधारस्तंभ होते. समाजातील तळागाळातील घटकांच्या विकासासाठी ते आयुष्याच्या अखेपर्यंत लढले.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आदरांजली
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने राज्यातील सर्वच विचारी लोकांना तीव्र दु:ख झाले आहे. एका नि:स्वार्थी विचारवंताची अशा पद्धतीने हत्या हे निव्वळ भ्याडपणाचे कृत्य आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना पकडून योग्य शासन करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा माझा विश्वास आहे. कॉ. पानसरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.
– सी. विद्यासागर राव, राज्यपाल

गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे शोषितांसाठी अखेपर्यंत लढणारा झुंजार पुरोगामी नेता राज्याने गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेली चळवळीची हानी कधीही भरून निघणार नाही.
– रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष

कुठलेही सुसंस्कृत शासन कायद्याच्या आधारे आपला दरारा निर्माण करते. गेल्या दोन वर्षांत विरोधी वातावरण आहे. काँग्रेसचे राज्य असो वा आता भाजपचे, गुन्हेगारांना आणि कायदा मोडणाऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. पानसरे यांचा खून संपत्तीसाठी करण्यात आलेला नाही. चांगल्या विचारांना नष्ट करण्यातून तो झाला आहे. जनता शांतताप्रिय असते; पण संघटित वर्ग समाजामध्ये अशा प्रकारचा दहशतवाद निर्माण करतो. महाराष्ट्रात दलितांनी जेव्हा मोर्चे काढले तेव्हा इथल्या पोलीस यंत्रणेने त्यामध्ये नक्षलवादी शिरल्याचे वातावरण निर्माण केले. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमागे कोणाचा हात आहे, हे शोधून काढावे. पोलिसांनी अशा प्रकारे वातावरण कलुषित करू नये.
– प्रा. गोपाळ दुखंडे, ज्येष्ठ समाजवादी नेते

कॉ. गोविंद पानसरे यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील डाव्या आणि पुरोगामी चळवळीला एक प्रचंड मोठे आव्हान आहे. विशेषत: दीड वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकर आणि आता कॉ. पानसरे यांची एकाच पद्धतीने हत्या होणे हा केवळ योगायोग नाही. याच्यामागे प्रतिगामी धर्माध शक्तींचे कारस्थान आहे. देशात अशाच प्रकारे स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीजींची हत्या झाली. तिथूनच या प्रक्रियेची सुरुवात झाली. ही हत्या नथुराम गोडसे म्हणजे रा. स्व. संघ आणि हिंदू महासभा यांच्याशी जोडलेल्या व्यक्तीने केली होती. महाराष्ट्रात १९७०च्या दशकात आमदार कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या आणि दलित पॅन्थरचे कार्यकर्ते भागवत जाधव यांची, तर आता दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या झाली. उजव्या प्रतिगामी शक्तींचा हुकूमशाहीवरील विश्वास तो या पाच प्रातिनिधिक हत्यांमधून स्पष्ट होतो. महाराष्ट्रातल्या सर्व डाव्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष शक्तींनी अशा वेळी एकत्र येऊन निर्धाराने याचा मुकाबला करायला हवा.
– डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष

कॉ. गोविंद पानसरे हे केवळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते नव्हते, तर महाराष्ट्रातील डाव्या आणि पुरोगामी विचारांचे सर्वच पक्ष आणि संघटनांचे ते मार्गदर्शक होते. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या अभ्यास शिबिरांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचीच हानी झाली आहे. एखाद्या व्यक्तीला मारून त्याचे विचार संपवता येत नाहीत. दाभोलकर गेले आणि कॉ. पानसरे यांच्यानंतर तिसरा कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. हा पुरोगामी चळवळीलाच इशारा आहे. त्यामुळे जातीयवाद्यांचा मुकाबला कसा करायचा, याचा विचार करण्याची वेळ डावे आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांवर आली आहे.
– अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, मुंबई सचिव, शेतकरी कामगार पक्ष

आधी दाभोलकर आणि आता पानसरे यांची हत्या झाली. ही निषेधार्ह बाब आहे. यामुळे महाराष्ट्रात दहशत निर्माण झाली आहे. हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलावीत.
– आनंद विंगकर, लेखक, कार्यकर्ते