मुंबई : त्यांचा थयथयाट रोजच सुरू आहे, फक्त आज जागा बदलली, अशी टीका करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुंबईकर जनतेचा भाजप-शिवसेना युतीलाच आशिर्वाद आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघात दुचाकी फेऱ्यांच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रा काढून भाजप-शिवसेना युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मात्र त्यात भाजपचे कार्यकर्तेच मोठय़ा संख्येने होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांनी उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढेच मला सांगावेसे वाटते. पण ते तसेही करायला मागे-पुढे पाहणार नाहीत, असा टोला शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांनी खेड येथील सभेत शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप आणि शिवसेनेवर आरोप केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही . त्यांना त्याशिवाय चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ. महाराष्ट्रात जो बदल घडलेला आहे, केंद्र आणि राज्य सरकारकडून विकासाची जी कामे सुरु आहेत, त्यामुळे त्यांची  पोटदुखी सुरु झाली आहे. त्याचाही इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे, अशी टिप्पणी शिंदे यांनी केली.

शिवसेनाप्रमुखांचे विचार हीच आमची संपत्ती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यांचे विचार आम्ही पुढे नेत असून आणि आमचे काम पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीच्या एका विजयाने ते एवढे हुरळून गेले आहेत की  आता राज्य आणि देशामध्ये बदल घडेल,असे त्यांना वाटत आहे. पण तीन राज्यांमध्ये भाजप जिंकला, हे त्यांना दिसत नाही. यापूर्वीदेखील बदलाचे वारे वाहून गेले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा महायुतीला  मिळतील आणि सर्व विरोधकांचा धुव्वा उडेल, असा दावा शिंदे यांनी केला.

आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत, असे शिंदे यांनी नमूद केले. शिंदे यांच्या उपस्थितीत वरळीच्या जांबोरी मैदानातून मुंबादेवीपर्यंत आशिर्वाद यात्रा काढण्यात आली. मुंबई भाजप अध्यक्ष  आशिष शेलार यांच्यासह अनेक भाजप व शिवसेना नेते त्यात सहभागी झाले होते. दुसरी आशीर्वाद यात्रा ईशान्य मुंबईत घाटकोपर येथील अमृतनगर ते मुलुंडपर्यंत काढण्यात आली. त्यात शेलार, खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, पराग शहा यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘पालघरची घटना विसरलात?’

  • पालघरची निष्पाप साधूंच्या हत्येची घटना एवढय़ात विसरलात, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांना केला आहे.
  • तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले. रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले. आता शिमग्याची ओरड पुरे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blessings mumbaikars to bjp sena alliance place has changed eknath shinde reply to uddhav thackeray ysh