मुंबई : मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्साही माहोल पाहायला मिळत आहे. तरुण – तरुणींच्या गोविंदा पथकाकडून मानवी मनोरे रचले जात असून हा रोमहर्षक थरार अनुभवण्यासाठी दहीहंडीप्रेमींची गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दादरमधील आयडीयलच्या गल्लीतील दहीहंडी उत्सवात दृष्टीहीन तरुण-तरुणींचा समावेश असलेल्या नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाने मानवी मनोरा रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नयन फाऊंडेशनच्या दृष्टिहीन तरुणांच्या गोविंदा पथकाने ४, तर तरुणींच्या गोविंदा पथकाने ३ थरांची शानदार सलामी दिली.दरम्यान, ‘टी – २०’ क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष आणि आनंद साजरा करण्यासाठी नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाच्या पुरुष सलामीवीराने कर्णधार रोहित शर्मा याचा मुखवटा घातला होता. तर कोलकत्ता आणि बदलापूर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महिला गोविंदांनी फलक हाती घेतले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दृष्टीहीन तरुण-तरुणींचा समावेश असलेल्या नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाचे यंदा ११ वे वर्ष आहे. या गोविंदा पथकाचा सराव माटुंग्यातील रुईया महाविद्यालयासमोर असलेल्या वीर मेजर रमेश दडकर मैदानात होतो. या गोविंदा पथकाला अनेकजण नोकरी सांभाळून सहकार्य करत असतात. दृष्टिहीनांचे साडेतीन थर रचत नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाची मुहूर्तमेढ २०१३ साली रोवली गेली. दहीहंडी उत्सवादरम्यान बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रक्कमेचा एक वाटा दृष्टिहीन – अंशत: दृष्टिहीनांना समान दिला जातो. तर दुसऱ्या वाट्यातून गोविंदांना गिर्यारोहणासाठी नेले जाते. तरुणांनंतर २०१७ साली दृष्टिहीन तरुणींनी थर रचण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>>राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचा काढणार विमा

‘आम्ही गुरूपौर्णिमेपासून सरावाला सुरुवात करतो. त्यानंतर जवळपास दोन महिने दररोज दोन तास सराव सुरू असतो. नयन फाऊंडेशनचे पुरुष गोविंदा पथक ४ आणि महिला गोविंदा पथक ३ थर रचते. यंदा पुरुष गोविंदा पथक हे ५ थर रचण्याचा प्रयत्न करणार आहे. दहीहंडीनिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे आणि या उत्सवाचा गोविंदा पथकातील सदस्य आनंद लुटत आहेत, हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. मुंबईसह ठाण्यातही आम्ही थर रचणार आहोत’, असे नयन फाऊंडेशनचे प्रमुख पोन्न अलगर देवेंद्र यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blind youth at the dahi handi festival in the lane of ideal in dadar mumbai print news amy