मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार असून त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. एकीकडे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, त्यांना वेगात आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. मात्र ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त बहुतांश जण कुटुंबियांसह बाहेरगावी निघाले आहेत. नियमित रेल्वेगाड्यांवरील प्रवाशांचा भार कमी होण्यासाठी, जादा रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. मात्र ब्लॉकमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडणार आहे. कोकण रेल्वेच्या करंजाडी – चिपळूण विभागात मंगळवारी दुपारी १.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत असा २.३० तासांचा ब्लॉक असणार आहे. तर, या कालावधीत अनेक रेल्वेगाड्यांना लाल सिग्नल दाखवला जाणार आहे.
ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते रत्नागिरी दरम्यान १०० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस कोलाड ते वीर दरम्यान ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक ०२१९७ कोईम्बतूर – जबलपूर विशेष एक्स्प्रेस रत्नागिरी – कामठे स्थानकांदरम्यान ७० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. सुमारे एक ते दोन तास रेल्वेगाड्यांना थांबा दिल्याने इतर रेल्वेगाड्याही विलंबाने धावतील. परिणामी, या मार्गावरील प्रवासाचा कालावधी वाढणार आहे.