राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच पोलिस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजीने उचल खाली असून सभागृहाचे कामकाज बंद पाडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काँग्रेसला समर्थन देणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर व पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यात झालेल्या वादाची तीव्र प्रतिक्रिया अधिवेशनात उमटली. त्या अधिकाऱ्याला विधानभवनात झालेल्या मारहाणीमुळे हे प्रकरण अधिकच चिघळले. त्यात पाच आमदारांना निलंबित करण्यात आले व त्यांतील दोन आमदारांना अटक करण्यात आली. त्यावरुन गेले दोन दिवस विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हंगामा सुरु आहे. त्या पोलिस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, या वरुन सर्वपक्षीय आमदारांनी सभागृहाचे कामकाज होऊ दिले नाही. त्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार पुढे असल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याचे समजते.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते. त्यात काही गडबड झाली तर त्याचा थेट सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. शिवाय राज्यातील दुष्काळाचे सावट अधिवेशनावर आहे. या अधिवेशनातून दुष्काळग्रस्तांना काय दिलासा मिळतो आहे, याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे. परंतु त्याऐवजी एका पोलिस अधिकाऱ्याने केलेले गैरवर्तन व त्याला काही आमदारांनी केलेली मारहाण यावरुन सभागृहाचे कामकाजच बंद पाडले जात असल्याने त्याचा चुकीचा संदेश जनतेत जात आसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
वास्तविक पाहता मारहाणीच्या प्रकरणाशी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही आमदारांचा संबंध नसताना सभागृहाचे कामकाज होऊ द्यायचे नाही, यासाठी सत्ताधारी आमदारच पुढे-पुढे का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या हाणामारीच्या प्रकरणाचे निमित्त करुन मुख्यमंत्रीविरोधी गट पुन्हा सक्रीय झाल्याचे बोलले जाते. सभागृहाचे कामकाज होऊ नये, यासाठी पुढाकार घेणारे आमदार हे काँग्रेसमधील दोन-तीन वजनदार नेत्यांचे समर्थक असल्याचे मानले जाते. त्यामुळे या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा काँग्रेसमधील काही नेत्यांचा प्रयत्न असावा, अशी चर्चा आहे. अधिवेशनाच्या काळाताच काँग्रेसमधील सक्रीय झालेली गटबाजी आणि निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला मुख्यमंत्री कसे तोंड देतात, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा