राज्यात दुष्काळ आहे..कुठयं? दिसत तर नाहीय? उगाच काहीही हवा करायची…इथे शहरात मस्त होळी आणि धुळवड साजरी केली जातेय…लहानथोरांसोबत सुजाण मंडळी देखील धुळवडीच्या रंगात ओलेचिंब होऊन धम्माल करतायत…बुरा ना मानो होली है…म्हणत शहरातील सो कॉल्ड सुजाण मंडळी घरातील ड्रम, बादल्या, टाक्या खाली करतायत…तर कुठे टँकर खाली केले जातायत…
पालिकेने म्हणे गेल्या वर्षापेक्षा काही लाखभर लिटर पाणी कमी सोडण्याचा निर्णय वगैरे घेतला…उगाच का ही अशी पालिकेची अरेरावी ना.. आम्हाला तर आज उलट जास्त पाणी लागणार.. माझ्या ‘त्या’ मित्राला मला नखशिकांत भिजवायचयं…तुमच्या पेक्षा माझा रंग वरचढ या इराद्याने..ओ भैय्याजी वो डार्कवाला भैय्या कलर है क्या? असं विचारत दुकानं हिंडली जातायत..किती मज्जा ना.. फ्रेंड्ससोबत होळी खेळण्यानंतर चेहऱयाला किती तो रंग लागणार..मग तो साफ करण्यासाठी पाणी नको का? तिथे विदर्भ मराठवाड्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय म्हणे.. बट इट्स देअर डेली रुटीन ना..सो लेट इट बी. आम्हाला काय त्याचं..आम्ही शहरी मंडळी अर्थात विकासनशील देशातील ‘विकसीत’ मंडळी.. आम्हाला सगळं आयतं मिळतं.. मग आम्ही तरी काय करणार..आम्ही इथे मस्त डिजेच्या तालावार ठेका धरतोय..छान शॉवर देखील सुरूयं किती भारी..
पण आमच्यातील एकाने ‘पाणी वाचवा’चा संदेश देत..चार मिनिटं लेक्चर झाडंल आणि कोरड्या रंगाने होळी खेळायला सांगितली..मग काय पाणी बंद झालं..डिजे तर सुरूय, कोरडे रंग उधळले जातायत.. पण पाण्याशिवाय होळी म्हणजे.. नांगर हाय, बैल जोडी हाय, बियाणं हाय, जमीन नांगरली हाय, शेतकरी दादापण सज्ज झालाय पण पाऊसच न्हाय..असचं झालं की. दुष्काळामुळे पावसाची वाट पाहात आसमंताकडे डोळे लावून बसलेला शेतकऱयाचा तो फोटो फिरतो ना सोशल मीडियावर अगदी तसं झालंय आमचं आता..काय सांगणार या ‘पाणी वाचवा’चा संदेश देणाऱयाला..कोरडी होळी खेळल्यानंतरही पाणी लागणारच ही गोष्ट वेगळीच म्हणा..असो. पाणी न्हाय म्हणून शेतकऱयाचे हाल झालेत म्हणतात काही जण…अनेक शेतकऱयांनी आत्महत्या देखील केल्यात हे पाहिलं होतं.. त्या कुठल्यातरी चॅनलवर दाखवत होते. खरंच वाईट वाटलं होतं. आम्ही फेसबुकवर शेतकऱयांना सपोर्ट करणाऱया पोस्ट देखील शेअर केल्या होत्या..शेतात नाही पण फेसबुकवर लाइक्स आणि शेअर्सचा पाऊस पडला होता. फ्रेंड्स रिक्वेस्ट देखील वाढल्या होत्या. आजही मैलोन मैल पाण्यासाठी वणवण करावी लागतेय गावाकडे.. पाण्यासाठी वणवण भटकल्याने काही चिमुकल्यांना जीव गमवावा लागला अशी बातमी पाहिली होती. विहिरी कोरड्या पडल्यात..टँकरभोवती गावकऱयांनी केलेली गर्दी..असे छान छान हार्टटचिंग फोटो पाहिले होते आम्ही. सो बॅड. पण किती लकी आहोत आम्ही शहरीमंडळी..आम्हाला अस काहीच करावं लागत नाहीय..घरी नळ उघडला की पाणीच पाणी आणि आज नेमकी होळी… सो सेलिब्रेशन तो बनता है ना यार.. चल सेलिब्रेट करू.. अे आण रे बादली.. एन्जॉय.. अँड शेतकरी दादा बुरा ना मानो होली है…
ता.क. कोणाला रंग लावण्याआधी राज्यातील दुष्काळी स्थितीचा विचार करा आणि कृतीही करा…
– मोरेश्वर येरम