”बंबई भाय.. बंबई हिंदुस्थान का अख्खा इकॉनॉमी उधरसेच ना! बंबईपर हमला बोलेंगे तो इंटरनॅशनल लेव्हलपर अख्खा दुनिया को मालुम पडेंगा भाय.. अख्खा दुनिया का लीडर, यू एन सब हिल जाएगा भाय..सारा सिस्टम हिल जाएंगा.. अख्खा दुनियांको मालुम पडना माँगता है की इस्लामी ताकद क्या है!” अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमात टायगर मेमनच्या तोंडी हा डायलॉग आहे. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचे प्लानिंग करत असतानाच्या सीनमध्ये तो हे म्हणत असतो.

आज हा डायलॉग आठवण्याचं कारणही तसंच आहे. काहीही घडलं की वेठीला धरली जाते ती फक्त आणि फक्त मुंबईच. कारण मुंबईत काही घडलं की त्याचे पडसाद देश पातळीवर जागतिक पातळीवर उमटतात. आजची सकाळ उजाडली ती एका आंदोलनाने. कामावर जायला निघालेल्या मुंबईकरांना पुढे काय वाढून ठेवले आहे याची साधी कल्पनाही नव्हती… आणि ‘रेल रोको’ आंदोलन झाले. चार तासांपेक्षा जास्त काळ मुंबई वेठीला धरली गेली. रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेल रोको करत, ‘मृत्यू तरी द्या किंवा नोकरी तरी द्या’ अशी मागणी लावून धरली.

गाढ झोपी गेलेल्या प्रशासनाला या आंदोलनाची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यामुळे हे आंदोलन फक्त झालं नाही तर चिघळलंही. आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल दगडफेकही झाली. मग चार तासांनी सारं काही शांत शांत झालं आणि सुटकेचा निश्वास सोडला तो मुंबईकरांनी. अनेकांनी ट्रॅकवरून चालत ऑफिस गाठणं पसंत केलं तर अनेकांनी घराबाहेर न पडणं पसंत केलं. अनेक लोक ट्रेनमध्येच अडकले होते. मुंबईत अगदी मागच्या २०-२२ वर्षांचा विचार केला तर ‘१९९३ च्या साखळी स्फोटां’ची घटना असो, ‘लोकलमध्ये बॉम्बस्फोट’ असोत किंवा ‘२६/११’ सारखा भीषण हल्ला असो काहीही झालं की वेठीला धरलं जातं ते फक्त आणि फक्त मुंबई आणि मुंबईकरांनाच. मुंबईत कामासाठी-नोकरी धंद्यासाठी येणारा माणूस रोज जीव मुठीत धरून प्रवास करतो असे म्हणतात ते काही खोटे नाही. त्याला समोर काय घडणार आहे आज कोणत्या प्रसंगला तोंड द्यायचे आहे याची पुसटशीही कल्पना नसते. अनेकजण मार्ग शोधून काढतात… आणि त्या सगळ्या तडजोडीला नाव दिलं जातं ते ‘मुंबईचं स्पिरिट’

याच वर्षातले हे दुसरे रेल्वे आंदोलन आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराची घटना घडली तेव्हा आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांनी वेठीला धरलं ते मुंबईलाच. ‘रेल रोको’ केला.. बंद पुकारला आणि सगळ्या देशानं या घटनेची दखल घेतली. भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले ते पूर्ण देशभर. या प्रकरणात चिथावणी देणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झाली नाही तर २६ मार्चला मुंबईवर कब्जा करू असा इशारा दिला आहे तो भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी. त्यामुळे तसे झाले तर पुन्हा एकदा मुंबईच वेठीला धरली जाईल.

२०१७ मध्येही मुंबई वेठीला धरली गेल्याच्या काही घटना घडल्या. २९ सप्टेंबर २०१७ हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस होता. कारण परळ स्टेशनवर दोन लोकल्स एकाच वेळी थांबल्या. त्यानंतर परळ-एल्फिन्स्टन पुलावर एकच गर्दी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये २३ मुंबईकरांचा मृत्यू झाला. याच घटनेने २९ ऑगस्ट २०१७ ला झालेल्या घटनेच्या आठवणीही ताज्या केल्या. मुसळधार पावसाने त्या दिवशी विविध घटनांमध्ये १० मुंबईकरांचा बळी घेतला. सकाळी घर सोडलेल्या लोकांना ऑफिस किंवा घर गाठायला दुपारचे ४ वाजले. मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावतो हे तर नित्याचेच प्रकार झाले आहेत. नालेसफाईचे, स्वच्छतेचे दावे महापालिकेकडून कायम केले जातात. मात्र प्रत्यक्षात जी काही परिस्थिती सहन करावी लागते ती मुंबईकरांनाच.

मुंबईतली नैसर्गिक आपत्तीची घटना, आंदोलन असो किंवा दहशतवादी हल्ला असो सामान्य मुंबईकरांची चूक नसताना ते त्यात कायम भरडले जातात. १९९३ ला म्हणे जिहाद पुकारण्यात आला होता. बाबरी मशिद पाडल्याचा राग मुंबईवर काढण्यात आला. ज्या शेकडो लोकांचा बळी गेला त्यांचा काय दोष होता? अशाच काही घटना पुढेही घडल्या १९९८ मध्ये विरारमध्ये बॉम्बस्फोट झाला त्यात ९ लोक ठार झाले. २००२ मध्ये घाटकोपर स्टेशनच्या बाहेर स्फोट झाला त्यात ३ लोक ठार झाले. २००३ मध्ये लेडिज स्पेशल लोकलमध्ये स्फोट झाला त्यात ११ लोक ठार झाले. २००३ मध्ये झवेरी बाजार आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी स्फोट झाले ज्यात ४६ लोक ठार झाले. २००६ मध्ये लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले ज्यात १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. २६/११ चा हल्ला हा तर मुंबईच्या इतिहासातला सर्वात मोठा हल्ला होता. दहा दहशतवाद्यांनी दोन दिवस मुंबई वेठीला धरली होती. या घटनेत १६० पेक्षा जास्त लोक मारले गेले. या सगळ्या घटनांचा विचार केला तर मुंबईकरांचा काय दोष होता? मुंबईवर फक्त राग काढण्यात आला. अनेक घटनांची किंमत मोजावी लागली ती मुंबईला.

हे सगळं कमी काय म्हणून डिसेंबर २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात ‘वन अबाव्ह’ आणि ‘मोजो ब्रिस्ट्रो’ या दोन रेस्तराँमध्ये आग लागली आणि त्यात १३ लोकांचा मृत्यू झाला. चौकशी अंती हे समजले की या दोन रेस्तराँचे बांधकाम अनधिकृत होते. तसेच हुक्का सर्व्ह करण्याची परवानगी त्यांना देण्यातच आलेली नव्हती. १३ लोकांचा बळी गेला तेव्हा अनधिकृत बांधकामांवर हतोडा चालवण्याची बुद्धी महापालिकेला झाली.

मुंबईकरांसाठी लोकल उशिरा येणं, ओव्हरहेड वायर तुटणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणं, ट्रेन किंवा एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरणं या गोष्टी तर नित्याच्याच होऊन बसल्या आहेत. ही सगळी मानवनिर्मित संकटं आहेत. त्यांच्याकडे होणारं दुर्लक्ष मुंबईकरांच्या जिवाशी खेळ करतं आहे. मुंबईकर या अशा घटनांमुळे आत्मकेंद्रीही होत चालले आहेत. पूर्वी लोकलमध्ये किमान गर्दीच्या वेळी लोकांच्या गप्पा ऐकू यायच्या काही काही गोष्टी या खरोखर विरंगुळा करणाऱ्या असत. आता सगळ्यांच्या हातात मोबाइल असतो त्यावर ल्युडो किंवा तसलाच तत्सम गेम सुरु असतो.. अगदीच काही नाही तर सिनेमा सुरु असतो.

मुंबईवर ओरखडा उमटवणारी एक जरी घटना घडली तरीही आपलं कुणी नाही ना त्यात? एवढी एक खात्री केली जाते… आणि मग हळहळ व्यक्त करून मुंबईकर पुन्हा कामावर निघतो. हे त्याचं स्पिरीट नाही. हा त्याचा नाइलाज असतो.. पुढच्या घटनेसाठी तो तयार असतो.. तो आसवं गाळत बसत नाही. प्रसंगाला सामोरा जातो. आपल्या पद्धतीने त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करतो.. कदाचित पुन्हा असे घडणार नाही याची भाबडी आशा मनात बाळगून!

समीर जावळे

sameer.jawale@indianexpress.com

Story img Loader