–राजू परुळेकर

पोलीस सेवेतून १५ वर्षांपूर्वी सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याची नामुष्की ओढवलेल्या त्या पोलीस शिपायाचे सर्वस्व हिरावून गेले आहे. नोकरी गेली, कुटुंब संपले, घरही सरकारने ताब्यात घेतले. आतापर्यंत जनतेच्या सुरक्षेची सेवा बजावल्याच्या कामाचा हक्काचा मोबदलाही त्याला मिळालेला नाही. तो मिळावा यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून तो गृहविभागचे उंबरे झिजवत आहे. मात्र, अद्याप त्याच्या या प्रयत्नांना यश आलेले नाही. हक्काच्या पैशासाठी वारंवार चकरा मारताना आता नायगावचे परेड ग्राऊंडच त्याचे घर बनले आहे.

बक्कल क्र. १८४१९ कोंडीबा यल्लापा भोसले हे १९७७ साली पोलीस सेवेत दाखल झाले. त्यानंतर २६ वर्षांच्या प्रदीर्घ काळाच्या सेवेनंतर आजारपणाच्या अपरिहार्य कारणास्तव विनापरवाना सेवेवर गैरहजर राहिल्याने कार्यालयाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले. ती शिक्षा कमी करत सन २००३ साली कोंडीबा भोसले यांना सक्तीची सेवा निवृत्ती घेण्याचे आदेश देण्यात आले. गृह विभागाच्या कार्यालयाने दिलेल्या शिक्षेनुसार सन २००३ साली कोंडीबा भोसले यांनी सक्तीची सेवानिवृत्ती घेतली. मात्र, त्यानंतर गृहविभागाच्या कामचुकारपणाचा मोठा फटका त्यांना बसला. त्याचे कारण म्हणजे आस्था-१, गृहविभागाने काढलेल्या आदेशात कोंडीबा यल्लपा भोसले यांच्या सक्तीच्या सेवानिवृत्ती नंतरच्या निवृत्ती वेतनाची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून सक्तीची सेवानिवृत्ती घेणारे पोलीस शिपाई कोंडीबा भोसले हे कक्ष-५ मध्ये हक्काच्या पेन्शन, ग्रॅज्युटी आणि पीएफसाठी खेटे घालत आहेत. मात्र, गृह विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे २६ वर्षे जनतेला सुरक्षा पुरवणारा एक पोलीस शिपाई आज रस्त्यावर आला आहे. तो आता नायगावच्या पोलीस परेड ग्राउंडवर राहत आहे. तब्बल १५ वर्षे कागदी घोडे नाचवत पोलीस शिपायाला खेटे घालायला लावणाऱ्या त्या असंवेदनशील अधिकाऱ्यांवर आणि लिपिकांवर गृह विभागाने काय कारवाई केली हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

सक्तीची सेवानिवृत्ती घेतलेले कोंडीबा भोसले यांची पत्नी कुटुंबाच्या आर्थिक आधारासाठी पतीच्या पीएफ, ग्रॅज्युटी आणि पेन्शनची वाट पाहत होती. पण ती मिळेल याची वाट पाहतच त्यांनी कोडिंबा भोसले यांची साथ सोडली. पत्नी आणि मुलबाळ नसल्याने कोंडीबा भोसले एकटेच राहिले. मात्र, तरीही आपल्या हक्कासाठी लढा सुरुच ठेवला आहे. त्यांचे पोलीस लाईनमधील घरही गृहविभागाने काढून घेतले. त्यामुळे तब्बल १५ वर्षांपासून ते बेघर होऊन रस्त्यावर दिवस काढीत आहेत. रोज नायगावच्या कक्ष-५ मध्ये जाऊन माझी हक्काची देणी द्या, अशी याचना करीत आहेत. मात्र, असंवेदनशील असलेल्या राज्याच्या गृह विभागाला अद्याप पाझर फुटलेला नाही.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कक्ष-५, डी. एन. रोड, मुंबईद्वारे २० डिसेंबर, २०१८ रोजी धाडण्यात आलेल्या पत्रान्वये उपसचिव, आस्था-१, गृह विभाग महाराष्ट्र शासन, मंत्रालय यांना पोलीस शिपाई कोंडीबा भोसले यांच्या सक्तीच्या सेवानिवृत्तीनंतरच्या वेतनाबाबत कुठलेच आदेश मिळाले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आणखीन किमान तीन ते पाच वर्षे भोसलेंना त्यांची सेवानिवृत्तीनंतरची देणी मिळतील की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पीएफ, ग्रॅज्युटी, पेन्शन यांची वाट पाहत कोंडीबा यांच्या पत्नीने प्राण सोडले त्यानंतर आता कोंडीबा किती दिवस गृहविभागाच्या आदेशाच्या केवळ आशेवर राहतील, हा प्रश्न आहे.

Story img Loader