लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील सर्व रक्तपेढ्या अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक रक्तपेढीतील उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री, कार्यपद्धती, रक्तासाठी आकारण्यात येणारे शुल्क याची तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना महिनाभरात सर्व रक्तपेढ्यांची तपासणी करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.

राज्यातील रक्तपेढ्यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये शासकीय, निमशासकीय, खाजगी, सार्वजनिक विश्वस्त संस्था, इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित, महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या रक्तपेढ्या अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या रक्तपेढ्यांची तपासणी करण्याचा करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल पुढील महिनाभरामध्ये सादर करावा, असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना दिले आहेत.

कोणत्या घटकांची तपासणी होणार

राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांची तपासणी करण्यासाठी २७ घटक निश्चित केले आहेत. यामध्ये रक्तपेढ्यांकडून वर्षभरात संकलित करण्यात आलेले रक्त, मागील वर्षी वितरित करण्यात आलेले रक्त, मागील वर्षभरात वाया गेलेले रक्त व रक्तघटक, रक्ताचे विघटन करण्यासाठी उपलब्ध यंत्रसामुग्री व मनुष्यबळ, मागील वर्षामध्ये राज्यात किंवा राज्याबाहेर हस्तांरित करण्यात आलेले रक्त, रक्तावर आकारण्यात येणारे शुल्क, रक्तकेंद्रासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीची उपलब्धता, थॅलेसेमिया व हिमोफेलिया यांना उपलब्ध करण्यात येणारे मोफत रक्त, परवाना रद्द झाल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आल्याचा तपशील, ऐच्छिक रक्तदानादरम्यान रक्तदात्यांना बक्षीस दिले का आदींची तपासणी करण्यात येणार आहे.

कोणामार्फत होणार तपासणी

राज्य रक्त संक्रमण परिेषदेच्या जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी, पॅथालॉजिस्ट वर्ग-१ किंवा रक्त संक्रमण सेवेतील तज्ज्ञांमार्फत राज्यातील सर्व रक्तपेढ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. रक्तपेढ्यांची तपासणी करण्यासाठी परिषदेकडून तपासणीसूची नमुनापत्र तयार केले आहे. त्यामध्ये दिलेल्या २७ घटकांची तपासणी करण्यात येणार आहे.

बळकटीकरणासाठी कंत्राटी तत्त्वावर पदभरती

रक्तपेढ्या अधिक सक्षम करण्यासाठी बाह्यस्त्रोतांद्वारे कंत्राटी पद्धतीने पदे भरणे, आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करणे, रक्तसंकलनासाठी वाहन उपलब्ध करून देणे, जिल्हास्तरावरील कार्यक्रम अधिकारी पद निर्मिती करण्यासाठी फेरतपासणी करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला. तसेच या सर्व बाबींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले आहेत.