मुंबई : राज्य रक्त संक्रमण परिषदेने उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी फेब्रुवारीपासूनच कंबर कसली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने एप्रिल आणि मेमध्ये पुरेसे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकारण्यांनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनातून हात आखडता घेतला आहे. परिणामी, रक्तपेढ्यांसमोर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविद्यालयातील युवा वर्ग रक्तदानासाठी महत्त्वाचा स्राोत आहे. मात्र मार्चमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा पार पडल्यानंतर एप्रिल आणि मेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात. अनेक नागरिक गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक असते. तसेच अनेक रक्तदातेही बाहेरगावी जातात.

हेही वाचा… मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर

रक्तदात्यांच्या अभावामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे प्रमाण कमी होते. परिणामी, दरवर्षी एप्रिल – मे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून नियोजन सुरू केले होते.

स्थानक, गृहसंकुलांत संकलन

शासकीय रक्तपेढ्यांनी रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये रक्त संकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असला तरी राज्यभरामध्ये दररोज साधारण पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्याच वेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी सामाजिक, धार्मिक संस्थांना साद घालण्याची वेळ राज्य रक्त संक्रमण परिषदेवर आली आहे. या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरातून रक्त संकलन केले जाईल.

हेही वाचा… फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप ते ‘यूपीएससी’ परीक्षेत यश, धुळ्याचा हिमांशू टेंभेकर देशात ७३८ वा

राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतात. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय नेते मंडळींनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनात आखडता हात घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood collection and donation campaign hit due to lok sabha election code of conduct mumbai print news asj