रक्तपेढय़ा मुबलक असल्याने आवश्यकता नसल्याचे मत
मुंबई : गरजू रुग्णांना माफक दरात रक्तपुरवठा व्हावा याकरिता राज्यभर सुरू करण्यात आलेली ‘जीवन अमृत’ (ब्लड ऑन कॉल) ही योजना मुंबईत मात्र बारगळल्यात जमा आहे. कोणताही पूर्वअभ्यास आणि नियोजन न केल्यामुळे ही योजना मुंबईत मूळच धरू शकलेली नाही. त्यामुळे मुंबईमध्ये प्रस्तावित करण्यात आलेली आठ रक्त साठवणूक केंद्रांची योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. मुंबईत मुबलक प्रमाणात असलेल्या रक्तपेढय़ांमुळेच रक्त साठवणूक केंद्रांची आवश्यकता नसल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.
गरजू रुग्णांना इच्छित स्थळी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) ही योजना २०१४ मध्ये राज्यभरात सुरू करण्यात आली. १०४ या क्रमांकावर संपर्क साधला असता थेट रुग्णालयात रक्त पुरविण्याची सुविधा असणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी मुंबईत जे.जे.महानगर रक्तपेढीपासून करण्यात आली. ही योजना विस्तारली जावी या उद्देशाने ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ने मुंबईमध्ये आठ रक्त साठवणूक केंद्रे उभारण्याची घोषणा केली. या घटनेला आता तीन वर्षे उलटून गेली तरी एकाही केंद्रात ‘ब्लड ऑन कॉल’ची सुविधा सुरू झालेली नाही.
आठपैकी रेल्वे रुग्णालय (भायखळा), बीपीटी रुग्णालय (वडाळा), महानगरपालिका रुग्णालय (वसई), मालवणी उपजिल्हा रुग्णालय (मालाड) ही चार केंद्रे सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष रक्त पोहचविण्यासाठीची संस्था तिथे नेमण्यात आलेली नाही. त्यामुळे ही केंद्रे रुग्णालयापुरती मर्यादित राहिली आहेत. त्याने ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेला हातभार लागलेला नाही. व्ही. एन. देसाई (सांताक्रूझ), शताब्दी रुग्णालय (कांदिवली) या ठिकाणी प्रस्तावित केंद्राच्या रुग्णालयांमध्ये आधीच रक्तपेढय़ा उपलब्ध आहेत. तसेच भाभा रुग्णालयामध्येही (कुर्ला) रक्तपेढी होत आहे. रक्त पेढी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये पुन्हा नव्याने रक्त साठवणूक केंद्रे सुरू करणे व्यवहार्य नाही. त्यामुळे आठ रक्त साठवणूक केंद्रांची ही योजना बारगळण्याची शक्यता आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने मात्र ही शक्यता धुडकावून लावली. ‘ही केंद्रे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. केंद्राशी संबंधित असलेल्या रुग्णालयांसोबत बैठका घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले आहेत. त्यामुळे केंद्र सुरू करण्यासाठी परिषद प्रयत्नशील आहे,’ असे परिषदेचे साहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले.
अपुरा रक्तपुरवठा
मुंबईमध्ये सध्या सरकारी आणि खासगी अशा मिळून ५९ रक्त पेढय़ा आहेत. त्या तुलनेमध्ये रक्तपुरवठा मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे यामध्ये अजून रक्त साठवणूक केंद्राची भर घालून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे आठ साठवणूक केंद्रांची योजना गुंडाळण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. राज्य रक्त संक्रमण विभागाने गरज आणि उपलब्धता याचा अभ्यास न करताच ही योजना जाहीर केल्याचेही सांगितले जात आहे.