मुंबई: मूत्रपिंडग्रस्त रुग्णांची शारीरिक परिस्थिती विचारात घेता रुग्णांना जवळच्या रक्तशुद्धीकरण केंद्रांवर उपचार घेणे सुकर होते. त्यामुळे श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाने मुंबईतील विविध भागांमध्ये धर्मादाय संस्था व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून दररोज किमान ३०० रुग्णांना रक्तशुद्धीकरण उपचार उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार प्रभादेवी व गोरेगाव येथे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू केल्यानंतर आता चेंबूर येथे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
राज्यात दिवसेंदिवस मूत्रपिंडग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे. या आजारावर रक्तशुद्धीकरणासारख्या दीर्घ उपचाराची गरज असते. मात्र हे उपचार खर्चिक असल्याने अनेक रुग्ण ते अर्धवट सोडून देतात. या पार्श्वभूमीवर श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे मुंबईत १०० यंत्रावर तीन पाळ्यांमध्ये दररोज किमान ३०० रुग्णांना रक्तशुद्धीकरण उपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
हेही वाचा… २२ वर्षांच्या सेवेत १७ वर्षे प्रतिनियुक्तीवर! …तरीही ‘झोपु’; अभियंत्याला मुदतवाढ!
न्यासाने मुंबईतील विविध भागांमध्ये अन्य धर्मादाय संस्था किंवा सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे आप्पासाहेब मराठे मार्ग प्रभादेवी येथे महानगरपालिकेच्या जागेत १२ खाटांचे आणि गाेरेगाव येथे प्रबोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ८ खाटांचे तीन सत्रांमध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू केल्यानंतर आता चेंबूर येथे सुफला ट्रस्टच्या शरद नारायण आचार्य वैद्यकीय केंद्रासह रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रामध्ये ११ रक्तशुद्धीकरण यंत्रे असतील.
वर्षभरात १० हजार रुग्णांना होणार लाभ
चेंबूर येथील केंद्र तीन सत्रांमध्ये चालविण्यात येणार आहे. त्यानुसार ३ सत्रांमध्ये व प्रति सत्र ११ याप्रमाणे वर्षभरात १० हजार २९६ इतके रुग्णांचे रक्तशुद्धीकरण करण्यात येणार आहे. तेथे रुग्णांकडून २५० रुपये शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे.
वर्षाला ९३ लाखांचा खर्च
रक्तशुद्धीकरण केंद्र हे त्रयस्थ संस्थेमार्फत चालविण्यात येणार असून रुग्णांकडून घेण्यात येणारी २५० रुपये शुल्क वजा करून उर्वरित रक्कम न्यासाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रती रक्तशुद्धीकरणासाठी अंदाजे ९०० रुपयांप्रमाणे ९३ लाख इतका वार्षिक बोजा पडणार आहे. यासाठी न्यासाच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.