मुंबई : दिवाळीची सुट्टी आणि त्यापाठोपाठ आलेली विधानसभा निवडणूक यामुळे राज्यामध्ये ऐच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले आहे. परिणामी, राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, मुंबईसह राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. ही परिस्थिती लक्षात राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत परराज्यात रक्त हस्तांतरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांनी परराज्यातील रक्तपेढ्यांना रक्त विक्री केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तपेढ्यांकडून रक्त मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे केल्या आहेत.

हेही वाचा : स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५७ मृत्यू

राज्यात मोठी आपत्ती घडल्यास रक्त तुटवडा प्रकर्षाने जाणवू शकतो. असे असतानाही राज्यातील काही रक्तपेढ्या त्यांच्याकडील अतिरिक्त रक्त व रक्त घटक यांची मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. ही बाब लक्षात घेत रक्तपेढ्यांनी राज्यातील रक्ताच्या गरजेला प्राधान्य द्यावे. राज्यातील रक्ताची गरज पूर्ण केल्यानंतर रक्तपेढ्यांनी आंतरराज्यीय रक्त हस्तांतरण करावे, अशी भूमिका राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेतली आहे. दरम्यान, राज्यातील रक्तसाठ्याची परिस्थिती लक्षात घेता राज्यांतर्गत रक्त आणि रक्त घटकांचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण सुरू ठेवण्यास राज्य रक्त संक्रमण परिषदेने परवानगी दिली आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले.

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गृहनिर्माण संस्था संकुलामध्येही शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : मराठा आरक्षणाचा नवा कायदा वेगळा कसा? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

कायमस्वरूपी बंदीची मागणी

●राज्यातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी नागरिक स्वेच्छेने मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात.

●मात्र तरीही अनेक खासगी रक्तपेढ्या मोठ्या प्रमाणात काळा बाजार करून रुग्णांकडून जादा शुल्क आकारण्याबरोबरच राज्यातील रक्त व रक्त घटकांची अन्य राज्यामध्ये विक्री करतात.

●रक्ताचा तुटवडा निर्माण होण्यामागे हेही एक कारण असू शकते. त्यामुळे परराज्यात रक्त हस्तांतरणावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी केली आहे.