राज्यभरातील सर्व रुग्णालयांना रक्ताची गरज लागली तर सरकारतर्फे त्वरित रक्तपुरवठा करण्याची सोय एका योजनेद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी खास दुचाकी तयार करण्यात येणार असून त्याद्वारे एक तासाच्या आत रक्तपुरवठा केला जाणार आहे. यासाठी १०२ ही हेल्पलाइन सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. सुरुवातीला सिंधुदुर्ग आणि सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू केली जाणार आहे.
खास तयार करण्यात आलेल्या दुचाकीद्वारे रक्तपेढीपासून रुग्णालयापर्यंत रक्तपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या सुविधेमुळे एखाद्या रुग्णाला लागणारे रक्त उपलब्ध झाल्यानंतर त्या बदल्यात रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त द्यावे लागणार नाही.
सातारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ही योजना यशस्वी झाली तर दुसऱ्या टप्प्यांत मुंबई आणि पुणे येथे ही योजना राबविण्यात येणार आहे. रुग्णांना त्वरित रक्त मिळावे यासाठीच ही योजना असेल, असेही अधिकाऱ्याने सांगितले. रक्तपेढीपासून ४० किलोमीटरच्या परिसरात किंवा जास्तीत जास्त एक तासाच्या अंतरापर्यंत असलेल्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा पुरविता येणार आहे. राज्यांतील ७५ टक्के रक्तपेढय़ा जिल्ह्यांच्या ठिकाणी असून त्यापैकी जवळपास ४६ टक्के रक्तपेढय़ा फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या शहरांमध्ये आहेत.

Story img Loader