गेली सात वर्षे ८५० रुपये किमान आधारभूत किंमत असलेली रक्ताची पिशवी लवकरच १३०० रुपयांपर्यंत महागणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर यासंबंधीचा निर्णय लागू होऊ शकतो. रक्त अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या अतिरिक्त चाचण्यांवरील शुल्कनिश्चितीही केली जाणार आहे.
अत्यावश्यक किमान चाचण्यांसह पुरविण्यात येणाऱ्या रक्ताच्या एका पिशवीसाठी २००७ मध्ये ८५० रुपये आधारभूत किंमत ठरवण्यात आली होती. प्रत्येक वर्षी वाढणाऱ्या महागाईच्या दरानुसार या शुल्कात वाढ करावी यासाठी खासगी रक्तपेढय़ांकडून सातत्याने मागणी सुरू होती. नागपूर  न्यायालयात यासंबंधी जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व धर्मादाय संस्थाच्या रक्तपेढय़ांचे प्रतिनिधी व राज्य रक्त संक्रमण परिषदेतील अधिकारी अशा बारा जणांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीने रक्ताची किमान किंमत १३०० रुपये करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली. मात्र रक्ताची किंमत ठरवण्याचा अधिकार केंद्राला असल्याने राज्याकडून केंद्राला विनंती करण्यात आली. केंद्राचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचे समजते. मात्र लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय त्यानंतर लागू केला जाण्याची शक्यता आहे.
रक्ताची आधारभूत किंमत सध्या ८५० रुपये असली तरी रक्त अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, तसेच अनेक चाचण्या केल्या जातात. त्यानुसार प्रत्येक रक्तपेढीकडून वेगवेगळ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. काही वेळा एका पिशवीची किंमत दोन ते अडीच हजारांपर्यंतही जाते. मात्र कोणत्या चाचणीसाठी किती अतिरिक्त शुल्क लावावे यासंबंधी आतापर्यंत कोणतीही मर्यादा नव्हती. केंद्राच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक अतिरिक्त चाचणीसाठीही शुल्कनिश्चिती केली जाईल व त्यासंबंधीचा फलक रक्तपेढीबाहेर लावणे अनिवार्य होईल.
खासगी रक्तपेढय़ांना वीज, वातानुकूलन, पाणी, डॉक्टर- कर्मचारी यासाठी खर्च करावा लागतो. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रक्तपिशवीच्या किमतीत वाढ करावी, ही मागणी रास्त आहे, असे जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी यांनी सांगितले.
रक्ताची किंमत वाढवण्याची शिफारस राज्याकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. केंद्राच्या प्रतिसादानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. संजय जाधव म्हणाले.