मुंबई : मागील दोन तीन दिवस झालेला जोरदार पाऊस आणि समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहू लागल्याने मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ब्लू बॉटलचा वावर दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षात या ब्लू बॉटलच्या दंशामुळे अनेक पर्यटकांना इजा झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्लू बॉटल हा समुद्री जीव असून त्याचे नाव त्याच्या आकारावरून आणि दिसण्यावरून पडले आहे. निळ्या रंगाचे असंख्य धागे (शुंडक) आणि त्यावर एक अपारदर्शक फुगा ज्यामध्ये हवा भरलेली असल्याने ते समुद्रावर तरंगते. दरम्यान, मुंबईच्या सागरी परिसंस्थेत तीन प्रकारचे जेलीसदृश जीव आढळतात. ठरावीक वातावरणात ते किनाऱ्यालगत येतात. पावसाळ्यापूर्वी ‘ब्लू बटन’, पावसाळ्यात ‘ब्लू बॉटल’ आणि पाऊस ओसरल्यावर ‘बॉक्स’ जेलीसदृश जीव किनाऱ्यावर आठळतात. त्यातील ब्लू बॉटल हा जीव विषारी म्हणूनच ओळखला जातो. हे समुद्री जीव पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर दिसून येतात. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे ब्लू बॉटलचे पुनरुत्पादन वाढले आहे. तसेच समुद्रातील वाढत्या कचऱ्यामुळे त्यांना भरपूर खाद्यही मिळते. मुंबईतील गिरगाव, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि दादर या समुद्र किनाऱ्यावर ब्लू बॉटल आठळून येतात. दोन दिवसापूर्वी गिगराव चौपाटीच्या किनाऱ्यावर सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांना ब्लू बॉटल दिसून आले.

हेही वाचा >>>म्हाडाच्या मुंबई मंडळाची १३ सप्टेंबरची सोडत अखेर लांबणीवर; अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ

दरम्यान, ब्लू बॉटलच्या विषारी धाग्यांना (शुंडक) मानवी स्पर्श झाल्यास ते दंश करतात. हा दंश अतिशय वेदनादायी असतो. किनाऱ्याला आल्यावर त्यांच्यापैकी बहुतेक जीव मृतावस्थेत वाटले, तरीही ते दंश करु शकतात. मानवाचा या धाग्यांना स्पर्श जाल्यास त्वचेवर लाल चट्टे येतात आणि आग होते. काही वेळा दंश झालेल्या भागावर सूज येऊन प्रचंड वेदना होतात. हे जीव दंशाचा वापर हे शिकार करण्यासाठी आणि स्वत:च्या रक्षणासाठी करतात. गत वर्षी जुहू चौपाटीवर सहा पर्यटकांना जेलीफिशचा दंश झाला होता.

दंश झाल्यास काय करावे?

ब्लू बॉटलचा दंश झाल्यास वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. दंश झालेला भाग चोळू नये, दंश झालेल्या भागावर अलगद समुद्राचे पाणी ओतावे किंवा कोमट पाणी ओतावे. त्वचेत रुतलेले काटे, निळे धागे काळजीपूर्वक काढून टाकणे गरजेचे असते आणि लगेच पुढील उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात लवकरात लवकर जावे. योग्य उपचार घेतल्यावर एक ते दोन तासांत वेदना कमी होऊन इजा बरी होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blue bottle jellyfish at girgaon chowpatty mumbai print news amy