मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईमधील जुहू समुद्रकिनाऱ्यावर विषारी ‘ब्लू बॉटल’ जेलिफिश आढळू लागले आहेत. सध्या मोठ्या संख्येन पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी येत असून ‘ब्लू बॉटल’मुळे पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण पसरू लागले आहे. पर्यटकांना ‘ब्लू बॉटल’पासून धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर अनवाणी फिरू नये, असे आवाहन समुद्रकिनाऱ्यांवर तैनात जीवरक्षक करीत आहेत.
‘पोर्तुगीज मॅन ओ वॉर’ या नावानेही ओळखला जातात –
हवा भरलेल्या निळ्या पिशवीसारखे दिसणारे ‘ब्लू बॉटल’ जेलीफिश ‘पोर्तुगीज मॅन ओ वॉर’ या नावानेही ओळखला जातात. ब्लू बॉटल ‘सिफोनोफोर’ कुळातील आहेत. पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेला प्रचंड वेगाने वारे वाहत असतात. भरतीच्या वेळी किनाऱ्यावर लाटा धडकत असतात. त्यामुळे वजनाने हलके असलेले जेलीफिश समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतात. त्यापैकीच एक असलेला ‘ब्लू बॉटल’ जेलीफिश विषारी म्हणूनच ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या सागरी परिसंस्थेचा अभ्यास करणाऱ्या ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’च्या कार्यकर्त्यांना जुहू समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’ दिसले.
दंश केल्यावर होतात तीव्र वेदना –
‘ब्लू बॉटल’च्या ‘टेंटॅकल्स’ पेशींमध्ये विषारी द्रव असते. त्यामुळे ‘ब्लू बॉटल’ने दंश केल्यावर माणसाला तीव्र वेदना होतात. सध्या ‘ब्लू बॉटल’ जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने दृष्टडीस पडत आहेत. त्यामुळे ‘ब्लू बॉटल’पासून सतर्क राहावे, समुद्रकिनाऱ्यावर अनवाणी फिरू नये, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
जेलिफिशचे तीन प्रकार –
मुंबईच्या किनाऱ्यावर साधारण तीन प्रकारचे जेलीफिश आढळतात. ठरावीक मोसमात जेलीफिश किनाऱ्यालगत येतात. पावसाळ्यापूर्वी ‘ब्लू बटन’, पावसाळ्यात ‘ब्लू बॉटल’ आणि पाऊस ओसरल्यावर ‘बॉक्स’ जेलीफिश किनाऱ्यावर दिसू लागतात.