मुंबई : प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णय घेतला असला तरी दिवसाला ६५० किलोमीटरचे रस्ते धुण्याचे उद्दिष्ट अद्याप दूरच आहे. पालिकेकडे पुरेसे टँकर नसल्यामुळे सध्या ५० ते ६० किमी लांबीचेच रस्ते धुतले जात असून, उद्दिष्टपूर्तीसाठी ९० टँकर भाडय़ाने घ्यावे लागणार आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धूळनियंत्रणासाठी बृहन्मुंबई महापालिकेने रस्ते, पदपथ धुण्याचा निर्णय घेतला. रस्तेधुलाईला ३ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुऊन काढण्यात येत आहेत. एकूण ६७६ किलोमीटर लांबीचे ३५७ रस्ते नियमितपणे धुण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, सध्या टँकरच्या कमतरतेमुळे दिवसाला केवळ ५० ते ६० किमी लांबीचेच रस्ते धुतले जात आहेत. आतापर्यंत दीड हजार किमी लांबीचे रस्ते धुतले गेले असले तरी दिवसाला सहाशे किमी लांबीचे रस्ते धुण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे नियोजन सुरू आहे.

हेही वाचा >>> कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ

मुंबईतील एकूण रस्त्यांची लांबी ही सुमारे २२०० किमी आहे. त्यापैकी ४० ते ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते धुवून स्वच्छ करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात असे किती रस्ते आहेत, त्याकरिता किती टँकर लागतील, याची माहिती २४ प्रभागांकडून मागवण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे १२० टँकरची गरज सध्या लागणार असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेकडे सध्या घनकचरा विभागाचे २२ टँकर असून पर्जन्यजलवाहिन्या विभागाचे सात टँकर असे मिळून केवळ ३० टँकरवर रस्ते धुण्याची भिस्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी ९० टँकर भाडय़ाने घेण्यात येणार असून पुढील किमान पाच महिन्यांसाठी वाढीव मनुष्यबळाची सेवा घेतली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या संपूर्ण कामासाठी १३ कोटींचा खर्च अपेक्षित असून, प्रत्येक विभागाला निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतर त्या- त्या विभागांनी आपल्या परिसरातील रस्ते धुण्याचे नियोजन करायचे आहे. रस्ते धुण्यासाठी पुनप्र्रक्रिया केलेल्या पाण्याचा, तसेच तलाव, विहिरी, कूपनलिका यामधून उपलब्ध पाण्याचा वापर केला जाणार आहे. माहीम, कुलाबा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा मुख्यत्वे वापर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन-चार तासांत काम

दररोज पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्तेधुलाई केली जाते. काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात रस्ते धुतले जात आहेत. रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc able to wash only 50 to 60 km long roads daily in mumbai due to shortage of tankers zws