पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नदी नाल्यांमधील केवळ गाळ उपसण्याचे काम नको, तर गाळ उपसण्याच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती रोखणे, हा नाले स्वच्छता करण्याचा प्राधान्याने उद्देश असावा, असे आदेश महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिकेच्या यंत्रणेला दिले. प्रचलित कार्यपद्धतीमध्ये योग्य ती सुधारणा करावी. सर्व संबंधित अभियंत्यांनी फक्त कार्यालयात बसून आढावा न घेता प्रत्यक्ष कार्यस्थळी दररोज उपस्थित राहून गाळ उपसा कामांवर योग्य देखरेख करावी, अशा स्पष्ट सूचनाही बांगर यांनी दिल्या.
मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नदी-नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे दरवर्षाप्रमाणे सुरू आहेत. पूर्व उपनगरांमधील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना आदेश दिले. या दौऱ्याप्रसंगी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
या दौऱ्यात घाटकोपर (पूर्व) येथे छेडा नगर जंक्शनजवळ सोमय्या नाला, कुर्ला स्थित माहूल खाडी नाला, शिवडी-चेंबूर रस्त्यावर माहूल खाडी नाला, वडाळा येथे रावळी निम्नस्तर नाला, कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर नाला, धारावी टी जंक्शन येथे दादर-धारावी नाला इत्यादी ठिकाणी बांगर यांनी भेट दिली. तसेच वांद्रे कुर्ला संकूल परिसरात भेट देवून मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली.
सर्व प्रमुख नाल्यांच्या बाबतीत गाळ उपसण्याचे नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे, विभाग कार्यालये व संबंधित यंत्रणांशी समन्वय राखावा. लहान नाले व मोठे नाले यांचे प्रवाह परस्परांवर परिणाम करतात. त्यामुळे प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्रापलीकडे जावून सर्व नाले स्वच्छ झाल्याची खातरजमा करावी, अशा सूचनाही बांगर यांनी दिल्या.
मिठी नदीतील गाळ उपसा कामांचीही पाहणी….
प्रमुख नाल्यांसह, मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामाची वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात भेट देवून बांगर यांनी पाहणी केली. एमएमआरडीए कार्यालय आणि धीरूभाई अंबानी शाळेलगत अशा दोन ठिकाणी भेट देऊन बांगर यांनी संपूर्ण पाहणी केली.
जेथे गाळ मोजला जातो त्या वजनकाट्यांच्या ठिकाणी पुरेशा संख्येने सीसीटीव्ही लावावेत. गाळ काढण्याच्या प्रत्येक सत्राचा अभिलेख (रेकॉर्ड) नोंदवावा. येत्या ५१ दिवसांत म्हणजे दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत गाळ काढण्याचे काम पूर्ण होण्यासाठी अतिशय दक्ष राहून पर्यवेक्षण करावे, कामाची गुणवत्ता व पारदर्शकता राहण्यासाठी गाळ उपसा कामांशी सर्व संबंधित अभियंत्यांनी फक्त कार्यालयात थांबून कामांचा आढावा घेऊ नये, तर गाळ काढण्याच्या कालावधीत प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहून कामांवर योग्य देखरेख करणे अनिवार्य असेल. रात्री काम सुरू राहणार असेल तर त्यावेळी देखील अभियंत्यांनी उपस्थित रहावे, असे आदेश बांगर यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागाच्या हद्दीतून वाहणाऱ्या मिठी नदीतील गाळ काढताना वन विभागाशी योग्य समन्वय राखावा, अशी सूचनाही त्यांनी िदली.