लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने साथीच्या आजारांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाहणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभाग, कीटकनाशक विभागांचे एक संयुक्त पथक तैनात करण्यात आले असून हे पथक मुंबईतील इमारती, वसाहतींमध्ये नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहे.

गेले काही दिवस मुंबईमध्ये अधूनमधून विश्रांती घेत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हिवताप, डेंग्यू यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कीटकनाशक विभाग, प्रशासकीय विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

हेही वाचा… मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! सहाय्यक कायदा अधिकारी पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती

या बैठकीत प्रत्येक प्रशासकीय विभागातील साथीच्या आजारांचा आढावा घेण्यात आला. तसेच साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, मुंबईमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामस्थळांची पाहणी करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाला दिले.

हेही वाचा… “देसाई पुढे बोलतायत, मागे सत्तारांनी पुडीच काढली”, काँग्रेसनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणे, “उद्या तिथे…!”

मुंबईमध्ये सुमारे चार हजार ठिकाणी बांधकाम सुरू आहे. या सर्व ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लोअर परेल, भायखळा, माझगाव, वांद्रे, प्रभादेवी, चेंबूर, अंधेरी, गोरेगाव, विक्रोळी या ठिकाणांचा समावेश आहे. या पाहणीदरम्यान नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात महानगरपालिका अधिनियम ३८१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये २ हजारांपासून १० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच विविध ठिकाणी बांधकाम करणारे विकासक, वसाहतींना जानेवारीपासून १५ जुलैपर्यंत सात हजार ६९३ नोटीसा देण्यात आल्या आहेत.

या बाबींची होणार पाहणी

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच इमारतींचे बांधकाम करणाऱ्या विकासकांना उपाययोजनांची सूची देण्यात आली होती. त्यात १० उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यात बांधकामस्थळी डासाची पैदास होऊ न देणे, पाणी साचू न देणे, कामगारांना मच्छरदाणी उपलब्ध करणे, ५० पेक्षा अधिक कामगार असल्यास त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. या उपाययोजना करण्यात आल्या आहे की नाही याची महानगरपालिकेच्या विशेष पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc administration has intensified its campaign against epidemics mumbai print news dvr
Show comments