सुरक्षा रक्षक भरतीत एकाच्या नावाने भलत्यानेच परीक्षा देण्याच्या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ९६८ उमेदवारांच्या प्रशिक्षणाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. दस्तुरखुद्द स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करूनही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या़  आता प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांच्या भोजनासाठी सुरक्षा रक्षक प्रमुखांच्या मर्जीतील कंत्राटदाराच्या झोळीत कोटय़वधी रुपयांचे कंत्राट टाकण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.
पालिकेच्या रुग्णालयाने सुरक्षा रक्षक पदासाठी सक्षम ठरविलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे प्रतापही संबंधितांनी केले आहेत. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी स्थायी समितीमध्ये आवाज उठविला होता. सभागृह नेते यशोधर फणसे यांनी तर घोटाळ्याची सर्व कागदपत्रे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे सादरही केली होती. सुरुवातीला घोटाळा झालेलाच नाही, असे म्हणणाऱ्या श्रीनिवास यांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
गोरेगाव (पूर्व) येथील एसआरपी प्रशिक्षण केंद्र, भांडूप संकुलातील भरती व प्रशिक्षण केंद्र, ठाण्यातील पोखरण येथे लष्कराचे प्रशिक्षण केंद्र आणि तळेगाव येथील एनडीआरएफचे मुख्यालय अशा चार ठिकाणी या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोखरण आणि तळेगाव येथे उमेदवारांसाठी पक्की घरे, शौचालये बांधण्यात आली आहेत. आता या चारही ठिकाणी उमेदवारांना भोजन पुरवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा घाटही प्रशासनाने घातला आहे. आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे स्पर्धेतील पाचपैकी चार कंत्राटदार बाद झाले. त्यामुळे २,६९,७७,५०० रुपयांचे कंत्राट सत्कार कॅटर्सला देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पुढील बैठकीत सादर करण्यात येत आहे.

Story img Loader