मुंबई : मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून आतापर्यन्त मुंबईतील ६५ टक्के रस्ते काँक्रिटचे झाले आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे सुरु असून सुरुवात केलेली कामे पावसाळ्यापूर्वी, ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टय महापालिका यंत्रणेपुढे आहे. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी रात्री पूर्व उपगरातील रस्ते कामांची पाहणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. शहर विभाग, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे कार्यक्षेत्रात काँक्रिटीकरण सुरु आहे. मुंबईत एकूण २०५० किमी लांबीचे रस्ते मुंबई महापालिकेच्या आखत्यारीत येतात. त्यापैकी गेल्या काही वर्षात एकूण १३३३ किमी म्हणजेच ६५ टक्के रस्त्याचे काँक्रिटिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या काँक्रिटिकरणाची कामे पालिकेने दोन टप्प्यात हाती घेतली आहेत. त्यापैकी काही कामे आता सुरु आहेत.

यंदाचा पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी म्‍हणजेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण झालीच पाहिजेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर हे काँक्रिटीकरण कामांची आकस्मिक पाहणी करत आहेत.

पूर्व उपनगरांत सुरू असलेल्या रस्त्याच्या पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी रात्री पाहणी केली. मुंबईस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (IIT) प्राध्यापक, रेडिमिक्स काँक्रिट (RMC) प्रकल्पाचे अभियंते, गुणवत्ता व्यवस्थापन व संनियंत्रण संस्थेचे (QMA) प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून बांगर यांनी कामकाजाचा आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देश दिले. .

पूर्व उपनगरातील एम पूर्व विभागात आगरवाडी गावठाण मार्ग, कै. सरदार गुरूबच्चन सिंह बल मार्ग येथील काँक्रिटीकरणाची बांगर यांनी पाहणी केली. प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) संजय सोनवणे यांच्यासह भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) प्रा. सोलोमन, प्रा.वेदगिरी, गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सिमेंट काँक्रिटचे चौकोनी तुकडे (क्यूब), रेडिमिक्स काँक्रिटच्या पावत्या आणि तांत्रिक अहवाल यांची यावेळी तपासणी करण्यात आली. काँक्रिटचे तापमान, स्लम्प चाचणी, फ्लेक्यजूरल बीम सॅम्पल कास्टिंग आदी तांत्रिक चाचण्याही यावेळी करण्यात आल्या.

काँक्रिटीकरण झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना, आठ ते बारा तासांमध्ये काँक्रिट ग्रुव्ह कटिंगची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, कॉंक्रिटीकरण सुरु असताना हवेतील आर्द्रता व वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याचा अभ्यास करण्यासाठी मोबाईल ॲपचा सुयोग्य वापर करावा अशा विविध सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी केल्या. काँक्रिट क्यूरींग पद्धतीमध्ये कशी सुधारणा करता येईल, पृष्ठभागावरील ब्रूमिंग कशाप्रकारे करावे यासह प्रत्यक्ष कार्यस्थळी येणाऱ्या अडचणी, आव्हाने यासाठी ‘आयआयटी’ने महानगरपालिका अभियंते, कंत्राटदार, गुणवत्ता व्यवस्थापन व संनियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करावी, अशी सूचनादेखील बांगर यांनी दिली.