दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. देशात सर्वत्र नागरिकांकडून दिवाळीची जोरदार तयारी केली जात आहे. पण मुंबई महापालिका आणि ‘बेस्ट’चे कर्मचारी अद्याप बोनसची वाट पाहत आहेत. गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच बीएमसी आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही. तसेच बोनस मिळणार की नाही? याबाबतही संभ्रम आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. तसेच त्यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. त्यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट लिहून सरकारला लक्ष्य केलं आहे.
‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, “माझा बीएमसी महापालिका आयुक्तांना एक महत्त्वाचा प्रश्न… अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिका आणि ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार (लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत) दिवाळी बोनस देणार आहे की नाही? देणार असेल, तर कधी? दिवाळी संपल्यावर?”
“जनतेच्या माहितीसाठी आणखी एक विषय आहे. रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याची फाइल अंतिम स्वाक्षरीसाठी महापालिका आयुक्तांच्या डेस्कवर पोहोचली आहे. ते त्यावर स्वाक्षरी करून त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करणार की खोके सरकारच्या दबावापुढे झुकून त्यांच्याबरोबरीने मुंबई लुटणार? पुढील २४ तासांत यापैकी काय होते ते पाहू…” असंही आदित्य ठाकरे पोस्टमध्ये पुढे म्हणाले.