(

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : गोरेगावमधील चित्रनगरी परिसरातील कचऱ्याच्या ढिगांची ध्वनिचित्रफित दुसऱ्यांदा अभिनेता शशांक केतकर यांनी समाज माध्यमांवर टाकली आहे. त्यामुळे चित्रनगरीतील कचऱ्याची जबाबदारी नक्की कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

चित्रनगरीच्या प्रवेशद्वारावरील ओसंडून वाहणारे कचऱ्याचे डबे, त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात असाव्यस्त पडलेल्या कचऱ्याची ध्वनिचित्रफित अभिनेता शशांक केतकर यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर टाकली होती. त्यानंतर हा कचरा साफ करण्यात आला. परंतु, गेल्या पंधरा दिवसात रोज या ठिकाणी तेवढाच कचरा साठलेला दिसत असल्याचे केतकर यांनी या ध्वनिचित्रफितीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा

तसेच हा कचरा उचलण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्याबद्दल त्यांनी मुंबई महापालिकेवर टीकाही केली आहे. मुंबईतील लोकसंख्या वाढत असून दिवसेंदिवस कचराही वाढत जाणार आहे. त्यामुळे हा कचरा उचलण्यासाठी पालिकेने यंत्रणा उभारावी व नियमितपणे कचरा उचलावा, अशी अपेक्षा केतकर यांनी या ध्वनिचित्रफितीतून व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> भाडेतत्वावरील बसमुळे ‘बेस्ट’ धोक्यात; बसच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

त्यांच्या या मजकूरावर मुंबईकरांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रस्त्यावर कुठे कचरा टाकला की ताबडतोब क्लीन अप मार्शल मुंबईकरांकडून दंड वसूल करतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा उचलण्याची व्यवस्था मुंबई महापालिका करीत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, चित्रनगरी परिसराच्या आतील कचरा उचलण्यासाठी चित्रनगरी प्रशासनाने कंत्राटदार नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून स्वच्छता करण्यात येते. तर बाहेरील परिसरात मुंबई महापालिकेकडून स्वच्छता केली जाते. संपूर्ण चित्रनगरी परिसरात कायम स्वच्छता राखली जावी यासाठी दोन्ही प्रशासनामध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc and film city administration to hold coordination meeting on waste management in film city mumbai print news zws