मुंबई : पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग येथील पालिकेच्या कचराभूमीतील कचऱ्याची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप रहिवासी, तसेच पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही या प्रकरणाकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यापूर्वी मानवी हक्क आयोगाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून कांजूरमार्ग कचराभूमीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे कांजूरमार्ग, भांडूप आणि विक्रोळी येथील नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. लहान मुले, वृद्धांनाही सकाळी फिरायला किंवा रात्री जेवणानंतर बाहेर पडणे कठिण झाले आहे.

याचबरोबर आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याच्या भितीने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेक संसर्गजन्य आजार बळाविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. तसेच राज्य सरकारचा नगर विकास विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही नोटीस पाठवली आहे. तरीही अद्याप याबाबत योग्य ती करावाई करण्यात आलेली नाही, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

याचबरोबर कचराभूमीवर पालिकेने नेमलेला कंत्राटदार योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत नसल्याचा आरोपही याआधी करण्यात आला आहे. दरम्यान, पालिकेकडे तक्रार करूनही याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही या प्रकरणी कोणती कारवाई करत नसल्याचे पर्यावरणप्रेमी आणि रहिवाशी स्टॅलिन डी यांनी सांगितले. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

संपूर्ण मुंबईचा कचरा उघड्यावरच टाकला जातो

या कचराभूमीवर संपूर्ण मुंबईचा कचरा उघड्यावरच टाकला जातो. मुंबईत दरदिवशी सुमारे सहा हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. येथील कचऱ्यावर दुर्गंधीनाशक द्रव्यही फवारले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी कोणतीही शास्त्रशुद्ध पद्धत वापरली जात नाही.

मच्छर, किटक वाढण्याची शक्यता

कचरा टाकण्यात येत असलेल्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात डास आणि किटक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे डेंग्यू, हिवतापासारखे आजार होण्याची शक्यता आहे. सतत दुर्गंधी येत असल्यामुळे श्वासोच्छवासाचाही त्रास होऊ शकतो. यामुळे मळमळ, सतत उलट्याही होऊ शकतात, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता मधुकर गायकवाड यांनी सांगितले.

मुलुंड पूर्व आणि ठाणे भागालाही फटका

या दुर्गंधीचा त्रास याआधी कांजूरमार्ग, भांडूप आणि विक्रोळी येथील नागरिकांना होत होता. आता मात्र या दुर्गंधीचा त्रास मुलुंड पूर्व आणि ठाणे भागातील रहिवाशांना सोसावा लागत आहे.