शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील अंत्यसंस्काराला पाऊण महिना उलटल्यानंतरही शिवसेनेने अंत्यसंस्काराची जागा महापालिकेच्या ताब्यात तर दिली नाहीच उलट तेथे कायमस्वरुपी स्मारक करण्याचा घाट घालून शिवसैनिकांचा खडा पहारा बसविला आहे. एक दिवसाची परवानगी घेऊन जागा लाटण्याचा ‘कोहिनूरी’ उद्योग शिवसेना खुलेआम करत असताना सरकार व महापालिका हतबलतेने पाहत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या वतीने सहाय्यक पालिका आयुक्तांनी तब्बल दोन आठवडे वाट पाहिल्यानंतर अंत्यसंस्काराची जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी यासाठी महापौर सुनील प्रभू व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नोटीस बजावली.
त्यानंतर शनिवारी शिवाजी पार्क येथे पोलीस बंदोबस्त वाढताच मोठय़ा प्रमाणात शिवसैनिकांना जमविण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेच्या मुखपत्रात तर अयोध्येतील राम मंदिराचा दर्जाच बाळासाहेबांच्या अंत्यंसस्काराच्या जागेला देण्यात आला. महापालिकेने बाळासाहेबांच्या निधनानंतर ही जागा केवळ एक दिवसासाठी महापौर व खासदार राऊत यांच्या अर्जाचा विचार करून दिली होती. मात्र आता पाऊण महिना उलटल्यानंतरही शिवसेना शिवाजी पार्कवरील जागा पालिकेच्या ताब्यात देण्यास तयार नाही. शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांचा तसेच क्रीडाप्रेमी लोकांचा बाळासाहेबांचे  स्मारक तेथे करण्यास स्पष्ट विरोध आहे. कायद्यानुसार ही जागा पालिकेला परत मिळणे आवश्यक आहे. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा बाऊ करत राज्य शासन व महापालिका आपली हतबलताच व्यक्त करत असल्याचे चित्र आहे.
गृहमंत्री आर. आर . पाटील यांनी शिवाजी पार्कवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस देण्याची तयारी दाखवली. मात्र महापालिका आयुक्त  कोणतीच ठोस भूमिका घेण्यास तयार नाहीत. सदाशिव तिनईकर असते तर एवढे दिवस कारवाईला लागलेच नसते, असे मत पालिकेतील काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दिलेल्या शब्दाला जागणारे होते. या लौकिकामुळेच त्यांना सर्व क्षेत्रातील लोक मानत असत. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच अनुयायांनी लेखी ‘शब्द’ देऊनही तो फिरविण्याचे काम करत आहेत.
जो लाखो जनसागर बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराला जमला होता त्यांना तरी शब्द फिरविण्याचा हा ‘कोहिनूरी’ उद्योग मान्य होईला का, असा सवाल काही सेनेतीलच काही लोकांकडून उपस्थित होताना दिसतो.     
‘शिवतीर्थ’ नामकरणास  काँग्रेसचा विरोध
शिवाजी पार्कचे ‘शिवतीर्थ’ नामकरण करण्याचा घाट महापालिकेतील शिवसेनेने घातला असून त्याबाबतचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या नामकरणाला विरोध केला असून १९२७ साली करण्यात आलेले ‘शिवाजी पार्क’ हे ऐतिहासिक नावच कायम राहिले पाहिजे, अशी भूमिका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे. ‘शिवाजी पार्क’ नामकरण बदलणे हा काही ‘शिव वडापाव’सारखा पोरखेळ नाही, असा टोलाही काँग्रेसच्या नगरसेवकांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा