मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेने महिलांना आपल्या जलतरण तलावांच्या सभासद शुल्कामध्ये २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या चारही जलतरण तलावांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या वेळेतील सत्रांसाठी ही सवलत देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> बीडीडीतील रहिवाशांना आता एकत्रित ११ महिन्यांचे घरभाडे देणार; म्हाडाचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर

मुंबईत महानगरपालिकेचे चार जलतरण तलाव कार्यरत आहेत.  नागरिकांना जलतरण तलावांचे सभासदत्व ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. जलतरण तलावाच्या प्रकारानुसार शुल्क आकारणी करण्यात येत असून या अंतर्गत आठ हजार रुपये  ते १० हजार १०० रुपये  इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येते. तसेच त्रैमासिक व मासिक सभासदत्वाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मालवाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर; फेब्रुवारीत ७० लाख टन मालाची वाहतूक

येत्या ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठीच्या राखीव सत्रांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या महिलांना २५ टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क १० हजार १०० रुपयांऐवजी ७ हजार ७०० रुपये इतके होईल. तर छोट्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क आठ हजार रुपयांऐवजी सहा हजार ०८० रुपये इतके होईल. याच पद्धतीने त्रैमासिक व मासिक शुल्कातही २५ टक्क्यांची सवलत लागू करण्यात आली आहे.