महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पुन्हा एकदा करोना रुग्णवाढीचा वेग वाढू लागला आहे. त्यासोबतच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील करोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि शहराची आरोग्य व्यवस्था यांवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिकेनं थेट मुंबईकरांना साद घातली आहे. करोनाचा प्रसार रोखणं हे मुंबईकरांच्या सहकाऱ्याशिवाय शक्य नाही, असं पालिकेनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवर टाकलेल्या संदेशात म्हटलं आहे. यासाठी गेल्या तीन महिन्यांची म्हणजेच या वर्षी जानेवारीपासूनची मुंबईतल्या करोनाबाधितांची आकडेवारी देखील या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.

 

या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये फक्त आकडे वाढताना दिसत आहेत. मात्र, वर दिलेल्या आकडेवारीमध्ये पालिकेनं मुंबईकरांसाठी संदेश दिला आहे. “२०२१ची सुरुवात आरोग्यदायी संदेशाने झाली होती. ११ जानेवारीला मुंबईत फक्त २३९ नव्या रुग्णांची भर पडली. पण पुढच्याच महिन्यात ११ फेब्रुवारीला ६२४ नवे रुग्ण वाढले तर आता ११ मार्चला तब्बल १५०८ नवे करोना रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. हा आलेख कोणत्या दिशेने जाईल, हे ठरवणं आपल्या हातात आहे. या व्हायरसला मुंबईवर मात करू देऊ नका. मुंबई, तुमच्याशिवाय आम्ही हे करू शकणार नाही”, अशा आशयाचा संदेश या ट्वीटमध्ये दिला आहे.

 

मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १२ मार्च या एका दिवशी १६४६ नव्या बाधितांची भर पजली असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आजघडीला एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १२ हजार ४८७ इतकी आहे. एकीकडे ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण या मुंबईच्या आजूबाजूच्या महानगरपालिकांनी शहरात करोनाबाबतचे निर्बंध घातले असताना आता मुंबईत देखील असेच निर्बंध घालण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई कधीही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

Story img Loader