मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा ते दहिसर, भाईंदर या कामाची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात आले आहेत. या कामासाठी १६,६२१ कोटींचा खर्च अंदाजित असून सल्लागाराने ७४ कोटी शुल्क आकारले आहे. विस्तृत प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक, आराखडे, निविदा दस्तऐवज तयार करणे या कामासाठी सल्लागार लागणार आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतचे काम सध्या मुंबई महापालिकेतर्फे सुरू आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. हे काम ८२ टक्के पूर्ण झाले असून मे २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर दहिसर- भाईंदर उन्नत रस्त्यासाठीही कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रियाही नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट भाईंदर पश्चिमपर्यंत प्रवास करता येणार आहे. वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी आता सल्लागार नेमण्यात आले असून हा मार्ग गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालाही जोडण्यात येणार आहे. हे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट  आहे.

हेही वाचा >>> भुजबळांमागे कुणाचे ‘बळ’? मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना खुले आव्हान

वर्सोवा ते दहिसर या मार्गासाठी सहा भाग करण्यात आले आहेत. त्यात वर्सोवा ते बांगूर नगर, बांगूर नगर ते माइंडस्पेस मालाड, माइंडस्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडे जाणारा बोगदा, चारकोप ते माइंडस्पेस दक्षिणेकडे जाणारा समांतर बोगदा, चारकोप ते गोराई आणि गोराई ते दहिसर असे सहा टप्प्यांत हे काम होणार आहे.

सागरी किनारा मार्ग..

* मरीन ड्राइव्ह ते वरळी सी लिंकचे दक्षिण टोक ..१०.५८ किलोमीटर (मुंबई महापालिकेचा प्रकल्प)

* वांद्रे-वरळी सी लिंक ..५.६ किमी (अस्तित्वात आहे) 

* वांद्रे-वर्सोवा सी लिंक ..१७ किमी (एमएसआरडीसी) 

* वर्सोवा-दहिसर जोडरस्ता ..२०.४ किमी (मुंबई महानगरपालिका)

* दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम उन्नत रस्ता ..५ किमी (मुंबई महानगरपालिका)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc appoints consultant for versova bhayandar coastal road project zws