महापालिका आयुक्तांची मान्यता; कार्यान्वित होण्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

मुंबई शहरातील नागरिकांकडून पाळीव प्राणी वापरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र दुर्दैवाने एखादा पाळीव प्राणी मरण पावल्यास त्याचा अंत्यविधी करण्याची भावना असतानाही तसे करणे शक्य होत नाही. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने पूर्व, पश्चिम उपनगर तसेच दक्षिण मुंबईत प्रत्येकी एका ठिकाणी पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिका क्षेत्रात कुत्रे, मांजर अशा प्राण्यांची संख्या मोठी आहे. घरातील या पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यविधीसाठी योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून सुरू होती. पाळीव प्राण्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मालकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. हे सर्व प्रकार आरोग्यदृष्टय़ा योग्य असतीलच असे नाही. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील भटक्या प्राण्यांच्या मृतदेहाबाबतची समस्या आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन गेल्या वर्षी पशुवधगृह विभागाकडून स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात झाली. आता हा प्रस्ताव प्रत्यक्षात तयार झाला असून आयुक्त अजोय मेहता यांची मंजुरीही मिळाली आहे. त्यानुसार दक्षिण भागात महालक्ष्मी, पूर्व उपनगरांमध्ये देवनार आणि पश्चिम उपनगरात मालाडमध्ये स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित आहे. या तिन्ही स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने सीएनजी या इंधनावर चालवल्या जातील, अशी माहिती महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेटय़े यांनी दिली.

सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खासगी अंत्यसंस्कार स्थळ असून ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालविले जाते. तर महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाच्या विल्हेवाटीची कार्यवाही ही बोरिवलीतील ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे केली जाते. महालक्ष्मी, देवनार व मालाड येथील स्मशानभूमी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याचे प्रशासकीय स्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहे. या स्मशानभूमीमध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ व इतर आस्थापना खर्च ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’अंतर्गत निवड होणाऱ्या संस्थेद्वारे केला जाणे अपेक्षित आहे. या प्रत्येक स्मशानभूमीसाठी साधारणपणे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च तसेच स्मशानभूमीच्या देखभालीसाठी व इंधनासाठी होणारा खर्च महापालिकेद्वारे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया येत्या जून महिन्यापर्यंत होणे अपेक्षित असून त्यानंतर प्रशासकीय परवानग्यांचा कालावधी लक्षात घेता साधारण सहा ते आठ महिन्यांनंतर या स्मशानभूमी प्रत्यक्षात उपलब्ध होतील. या स्मशानभूमींमध्ये कुत्रे, मांजरी यांसारख्या पाळीव प्राण्यांचे मृतदेह आणि ‘अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटर’ येथे मृत होणाऱ्या प्राण्यांच्या मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची सुविधा मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल.