मुंबई : मुंबई महानगरपालिकेने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही मराठा सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी सोपविली असून निरक्षर असलेल्या तमिळ भाषिक सफाई कामगारांची या कामासाठी नियुक्ती होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम नक्की योग्य पद्धतीने होईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम मंगळवार, २३ जानेवारीपासून सुरू झाले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मुंबईतही सर्वेक्षण करण्यात येत असून महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते शहर, उपनगर जिल्ह्यांमध्ये मराठा सर्वेक्षण करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न प्रगणक व पर्यवेक्षक नागरिकांना विचारणार आहेत. या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येणार आहे.
हे काम महानगरपालिकेच्या अभियंत्यांबरोबरच आरोग्य सेविका, शिक्षक आणि सफाई कामगारांनाही देण्यात आले आहे. हे काम २३ ते ३१ जानेवारी या काळात होणार आहे. त्याकरीता महानगरपालिका प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये निरक्षर सफाई कामगारांचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी याबाबत सांगितले की, हरिजनकुमार आनंद, देवेंद्र मुत्तुस्वामी आणि देवेंद्र अरमुगम या तीन सफाई कामगारांना हे काम देण्यात आले आहे.
हे तमिळ भाषिक असून त्यांना मराठी लिहिता, वाचता येत नाही. त्यामुळे ते या सर्वेक्षणाचे काम करताना अर्ज भरणे, मोबाइल ॲपचा वापर करणे ही कामे करू शकणार नाहीत. तरीही त्यांना ही कामे देण्यात आली आहेत. या कामगारांना तमिळ भाषेतून स्वतःची केवळ स्वाक्षरी करता येते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला केवळ हे सर्वेक्षण उरकून टाकयचे आहे, असा आरोप रानडे यांनी केला आहे. पालिकेची ही कृती म्हणजे मराठा समाजाची फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…जुन्या इमारतीतील क्षेत्रफळाइतके घर पुनर्विकासात मोफत मिळणार!
या प्रशासकीय कामासाठी प्रशिक्षित कर्मचारी मंगळवारपासून घरोघरी, सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असेल. या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. तसेच त्यांना अपेक्षित असलेली माहिती भरून द्यावी. ही माहिती भ्रमणध्वनीवरील एका ॲपमध्ये नोंदविण्यात येणार असून माहिती नोंदविल्यानंतर ती देणाऱ्याची स्वाक्षरी देखील ॲपमध्ये जतन केली जाणार आहे.