मुंबई : पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामाना सुरुवात झाली आहे. नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेनंतर शहर आणि उपनगरांसाठी मिळून २३ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे.
पावसाळ्यात मुंबईत पुरस्थिती येऊ नये म्हणून
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढला जातो तर लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर (वॉर्ड) असते. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होतो. प्रत्येक वर्षी नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून उद्दिष्ट निश्चित केले जाते.
वर्षभरात तीन वेळा गाळ उपसा
दरवर्षी नाल्यांमध्ये साचणारा गाळ हा वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी सर्वाधिक गाळ उपसा केला जातो. या प्रचलित पद्धतीनुसार, यावर्षी एप्रिल व मे २०२५ या दोन महिन्यांत नाल्यांमधील एकूण गाळाच्या ८० टक्के गाळ काढण्यात येईल, तर पावसाळ्यादरम्यान १० टक्के आणि पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मार्च अखेरपासून गाळ काढण्याची कामे सुरू झाली आहेत.
नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री नेमून कामांना गती द्यावी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कामांची पारदर्शकता आणि गुणवत्ता तपासावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत.
यंदा कंत्राटदारांसाठी कठोर अटी…
गाळ उपसा करण्याच्या कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता ठेवण्यासाठी यंदा कंत्राटांमध्ये अधिक कठोर अटी व शर्तींचा समावेश करण्यात आला आहे. नाल्यांमधून गाळ उपसा करण्यापूर्वी आणि गाळ उपसा केल्यानंतरची छायाचित्रे सादर करणे बंधनकारक तर आहेच. त्यापुढे जाऊन आता प्रत्येक कामासाठी ३० सेकंदांचे चित्रीकरण सादर करणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. लहान नाल्यांच्या बाबतीत गाळ काढण्यापूर्वीचे आणि गाळ काढल्यानंतरचे सीसीटीव्ही द्वारे चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लहान नाल्याच्या उगमापासून पातमुखापर्यंत (एन्ड टू एन्ड) हे चित्रीकरण करावयाचे आहे.
नालेसफाईत ‘एआय’
मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ उपसा केलेल्या कामांच्या या सर्व चित्रफिती कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रणालीचा वापर करून तपासण्यात येणार आहेत. गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे.
घरबसल्या माहिती उपलब्ध….
मुंबईकर नागरिकांना आपल्या परिसरातील नाल्याची स्वच्छता केली जात आहे की नाही, याबाबतची छायाचित्रे, चलचित्रे दररोज अद्ययावत स्थितीमध्ये महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येतील. महानगरपालिकेने नागरिकांसाठी ‘https://swd.mcgm.gov.in/