विरोधकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत रिलायन्स जिओ इन्फोकॉमला तब्बल ११६० जागा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी घेतला. या जागांचा उपयोग करून रिलायन्स कमावणार असलेल्या प्रचंड नफ्यातून पालिकेनेही वाटा मागावा ही विरोधकांची मागणी होती. पालिकेच्या शाळा, मैदाने, क्रीडांगणे आदी ११६० ठिकाणी दूरसंचार सुविधा कक्ष उभारण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी रिलायन्स जिओने पालिकेकडे केली होती. पालिका प्रशासनानेही जागा देण्याची तयारी दाखवून सुधार समितीपुढे त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. त्यावर सत्ताधारी युतीने शिक्कामोर्तब केले. स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीत विरोधकांच्या आक्षेपांकडे काणाडोळा करत अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. रिलायन्स जिओ दूरसंचार सुविधा कक्ष उभारून प्रचंड पैसा कमावणार आहे व त्यासाठी पालिकेची मालमत्ता वापरली जाणार असल्याने कंपनीच्या नफ्यातील काही हिस्सा पालिकेला मिळण्याच्या दृष्टीने प्रस्तावात बदल करावा, अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली होती. शहरभर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स जिओच्या ११६० दूरसंचार सुविधा कक्षाचा वापर करता येऊ शकेल. तसे बदल या प्रस्तावात करावेत, असेही देशपांडे यांनी सूचित केले. मात्र, महापालिकेच्या फायद्याच्या या सूचना करण्यात येत असताना
सत्ताधारी नगरसेवक मुग गिळून गप्प बसले होते. आता आज, बुधवारी सकाळी पालिका सभागृहाची तातडीची सभा आयोजित करण्यात आली असून तीत रिलायन्स जिओ इन्फोकॉमसह अन्य काही ‘अर्थ’पूर्ण प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे.

Story img Loader