Brihanmumbai Municipal Corporation Budget 2025 : देशभरात वस्तू आणि सेव कराची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद करण्यात आला. त्यामुळे मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला. नवीन करप्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, न्यायप्रवीष्ट प्रकरणे, कर देयके देण्यास झालेला विलंब अशा अनेक कारणांमुळे मालमत्ता कर वसुलीचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. मालमत्ता कराची थकबाकी २२५६५.३८ कोटी रुपयांवर पोहोचली असून थकबाकी वसुलीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. दरम्यान, आगामी वर्षात मालमत्ता करापोटी ५२०० कोटी रुपये महसूल मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालमत्ता कराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे करदात्यांना २०२३-२४ या आर्थिक वषासाठी संरक्षणात्मक आधारावर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मालमत्ता कर देयके देण्यात आली. या देयकांची देय दिनांक २५ मे २०२५ होता. परिणामी २०२३-२४ या वर्षात एकूण मागणीपैकी प्रत्यक्षात २८६०.६० कोटी रुपये मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. मालमत्ताधारकांना २०२४-२५ या वर्षाची ६७४२.७४ कोटी रुपयांचे देयके १३ सप्टेंबर २०२४ रोजी देण्यात आली. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मालमत्ता करापोटी ५२२९.२० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. त्यामुळे २०२३-२४ या वर्षातील १४९१.३६ कोटी रुपयांचा समावेश आहे. म्हणजेच २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी ४९५० कोटी रुपये उत्पन्न प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी ३७३७.८४ कोटी रुपये वसूल करण्यात करनिर्धारण आणि संकलन विभागाला यश आले आहे. महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुली सुधारित केली असून आता मालमत्ता करापोटी ६२०० कोटी रुपये मिळतील असा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे.

मालमत्ताधारकांच्या याचिकेच्या अंतरिम निर्णयानुसार मालमत्ता कराच्या ५० टक्के रक्कम अधिदान करण्यात येत आहे. मालमत्ता कराची ३१ मार्च २०२४ पर्यंत एकूण थकबाकी २२५६५.३८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रशासनाने हाती घेतलेले विविध नागरी प्रकल्प, दैनंदिन सोयी-सुविधांवर होणारा खर्च लक्षात घेता ही थकीत रक्कम महापालिकेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc budget 2025 update in mumbai property tax arrears worth of 22565 crore mumbai print news asj