मुंबई : वांद्रे पश्चिमेकडील पटवर्धन उद्यानालगतचा २४ वा रस्ता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गादरम्यान पाली हिल जलाशयाlसाठी महापालिका प्रशासनाने ७५० मिलीमीटर व्यासाची नवी मुख्य जलवाहिनी टाकली आहे. ही जलवाहिनी गुरुवारी (३ एप्रिल) सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या १५ तास तासांच्या कालावधीत वांद्रेतील अनेक परिसरांच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत गुरुवारी बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा वेळ बदलाच्या कालावधीत काटकसरीने पाण्याचा वापर करावा. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यांनतर पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पाणीपुरवठ्यात बदल करण्यात आलेले परिसर
१) बाजार परिसर : पाणीपुरवठा ३० मिनिटे आधी सुरु करण्यात येईल. (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ६ ते ९.३०) (सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ५.३० ते सकाळी ९)
२) खारदांडा परिसर : खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेकडील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३०) (सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३०) ३) डॉ. आंबेडकर मार्ग परिसर : डॉ. आंबेडकर मार्गालगतचा परिसर, पाली गावठाण, पाली पठार, वांद्रे पश्चिमे व खार पश्चिमेकडील काही भागातील पाणीपुरवठा २ तास पुढे ढकलण्यात येणार आहे. (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री १० ते मध्यरात्रीनंतर १) (सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री १२ ते मध्यरात्रीनंतर ३)