मुंबई महापालिकेने शहरातील कचरा गोळा करुन डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्णपणे कंत्राटदाराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाविरोधात मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगार आजपासून (शुक्रवार) संपावर गेले आहेत. मुंबईतील २४ विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले असून यामुळे मुंबईत कचरा कोंडी झाली आहे.
मुंबई महापालिकेने बुधवारपासून शहरातील साफसफाईचे काम कंत्राटदाराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर कायमस्वरुपी सफाई कामगारांना अन्य विभागांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. या निर्णयाविरोधात कंत्राटी सफाई कामगार आक्रमक झाले आहे. शुक्रवारपासून कंत्राटी सफाई कामगारांनी मुंबईत कुठेही कचरा उचलणार नाही असे सांगत कामबंद आंदोलन सुरु केले. यामुळे मुंबईत कचरा कोंडी झाली असून यावर तातडीने तोडगा काढला नाही तर ही समस्या आणखी भीषण स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे.