महापालिकेच्या लिपिकांना आता कालबद्ध पदोन्नती तसेच कामगारांच्या मुलांची खाडा बदली कामगार म्हणून भरती केली जाणार आहे. महापौर सुनील प्रभू यांच्या दालनात शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
महापालिकेत १२ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना विनाअट कालबद्ध पदोन्नती देण्याच्या मागणीस महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी महापौरांच्या संमतीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून महापालिकेत खाडा बदली पद्धत सुरू केली जाणार आहे. यात २० टक्के खाडा बदली म्हणून कामगारांची मुले भरती केली जातील, अशी माहितीही या पत्रकात देण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने कामगार-कर्मचाऱ्यांना दिलेला चुकीचा ग्रेड पे बंद करून राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेला ग्रेड पे महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. नवीन लिपिकांना १ हजार ९०० रुपये, पाच वर्षे सेवा झालेल्या लिपिकांना २ हजार ४०० रुपये आणि त्यावरील लिपिकांना २ हजार ८०० रुपये असा ग्रेड पे आता देण्यात येणार असून अर्धकुशल, कुशल व अतिकुशल अशी वर्गवारी करून त्यांनाही त्यानुसार ग्रेड पे देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष बाबा कमद, कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांच्यासह महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे अन्य अतिरिक्त महापालिका आयुक्त आदी उपस्थित होते.

Story img Loader