मुंबईतील भटकी कुत्री लवकरच धुळवडीआधीच लाल, निळ्या, हिरव्या रंगाने रंगून जाणार आहेत. मात्र, ही श्वानांची धुळवड नसून पालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांची गणनेचा ठसा असणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्वानांना ठार मारण्याऐवजी त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. यापूर्वी २००७ मध्ये श्वानगणना करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत ७५,००० भटकी कुत्री असल्याचे आढळून आले होते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईतील त्यांच्या संख्येत वाढ झाली की घट हे सांगणे अवघड बनले आहे. त्यामुळे श्वानगणना करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. भूतान, ढाका, अहमदाबाद आदी ठिकाणी श्वानगणना करणाऱ्या ‘ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल’ या संस्थेवर पालिकेने ही जबाबदारी टाकली आहे. रस्त्यांवर रात्री अपरात्री पादचाऱ्यांच्या अंगावर गुरगुरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची गणना पालिका कशी करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मुंबईत पालिकेची १८३ आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रांच्या परिसरात ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलची चार पथके फिरणार असून दिसेल त्या श्वानावर रंगाचा स्प्रे मारून त्याची नोंदणी करण्यात येणार आहे. गणनेमध्ये नर, मादी आणि पिल्लू अशी त्यांची वर्गवारी करण्यात येणार आहे. हा रंग किमान महिनाभर तरी त्यांच्या अंगावर टिकून राहील, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. काही दिवसांनी हे पथक पुन्हा त्याच परिसरात जाऊन श्वानांची पाहणी करणार आहे. एखाद्या श्वानाच्या शरीरावर रंग आढळून आला नाही, तर त्याची माहिती टिपून घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण मुंबईतील श्वानांची गणना करण्यात येणार आहे.
भटकी कुत्री रंगणार लाल, निळ्या, हिरव्या रंगांत!
मुंबईतील भटकी कुत्री लवकरच धुळवडीआधीच लाल, निळ्या, हिरव्या रंगाने रंगून जाणार आहेत. मात्र, ही श्वानांची धुळवड नसून पालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांची गणनेचा ठसा असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्वानांना ठार मारण्याऐवजी त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. यापूर्वी २००७ मध्ये श्वानगणना करण्यात आली होती.

First published on: 07-03-2013 at 04:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc colour the street dog in red green and blue shade