ई टेण्डरींग प्रक्रिया अमलात आल्यानंतर वॉर्ड स्तरावर नगरसेवकांचा विकासनिधी अध्र्याहून अधिक पडून आहे. कामे रखडली आहेत, या मुद्दय़ावरून सोमवारी पालिकेच्या सभागृहात प्रचंड रणकंदन झाले. पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे आणि सर्वपक्षीय नगरसेवक  आमनेसामने उभे ठाकले.
 कामे पूर्ण झाली नसल्याचा तसेच अनेक कामे प्रलंबित असून प्रशासनाच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रचंड टीका केली. परंतु, तरीसुद्धा ५६ कोटी रुपयांची कामे झाल्याचे उत्तर आयुक्तांनी दिले. मात्र आयुक्तांनी नीट माहिती घेऊन उत्तर द्यावे असे म्हणत आयुक्तांवर अविश्वासाचा ठराव आणावा असे सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठरविले आहे.
नगरसेवकांच्या निधीतून वॉर्ड स्तरावर कामे करता यावीत, अधिक पारदर्शकपणा यावा म्हणून पालिका प्रशासनाने ई टेण्डरींगची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया अमलात आणली खरी परंतु, त्यामुळे वॉर्ड स्तरावरची अनेक कामे रखडल्याचे नगरसेवकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. ई टेण्डरिंग पद्धतीमुळे कामे रखडली आणि नगरसेवक निधी वाया जाणार अशी भीती अनेक नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केली.
सभागृह  नेते शैलेश फणसे यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर ई टेण्डरिंग प्रक्रिया सपशेल अयशस्वी ठरल्याच्या मुद्दय़ावरून जोरदार टीका केली.
अनेक नगरसेवकांना आपल्या वॉर्डातील कामांसाठी पत्रे दिली असूनही कामे केली जात नाहीत, याबाबतही प्रचंड नाराजीचा सूर व्यक्त झाला. यंदाच्या अर्थसंकल्पातील केवळ २१ टक्केच निधी खर्च करण्यात आला आहे.  ३१ डिसेंबपर्यंत कंत्राटदार नेमले नसल्यामुळेही पत्रे देऊनही अनेक कामे रखडली आहेत याबाबत सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. २२ नगरसेवकांनी पत्रे देऊन आपल्या वॉर्डात एकही काम झालेले नाही असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून विरोध पक्षनेता ज्ञानराज निकम यांनी प्रशासनाच्या ढिल्या कारभाराबद्दल तीव्र शब्दांत टीका केली. मात्र ई टेण्डरिंग प्रक्रिया पारदर्शक असून ती मोडीत काढता यावी म्हणून ठेकेदार-कंत्राटदार सक्रिय झाल्याचा आरोप करून पालिका आयुक्तांनी ही पारदर्शक यंत्रणा मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा इशारा दिला. पालिका आयुक्त विरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक यांच्यात तब्बल तीन तास जबरदस्त खडाजंगी झाली.