मुंबई : मुंबईतील आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी, नागरिकांना अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने मुंबईत व्यापक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई १४ ते २० एप्रिलदरम्यान आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहात विविध रुग्णालये, व्यापारी-निवासी संकुल, शाळा येथे प्रात्यक्षिक आणि रंगीत तालमीचे (मॉक ड्रील) सादरीकरण करण्यात येणार असून प्राथमिक अवस्थेतील आग शमवणे, स्वयंपाक घरातील गॅस गळती रोखण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालय प्रांगणात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
मुंबई गोदीतील एस. एस. फोर्ट स्टिकीन या बोटीमध्ये १४ एप्रिल १९४४ रोजी महाप्रचंड स्फोट होऊन गोदीमध्ये भीषण आग लागली होती. या अग्निप्रलयाशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ जवान व अधिकारी वीरगती प्राप्त झाली होती. अग्निशमन सेवेतील वीरांना मानवंदना देण्यासाठी भारत सरकारने १९६८ मध्ये १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून जाहीर केला. तेव्हापासून १४ एप्रिल ते २० एप्रिल हा सप्ताह अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो.
ग्निसुरक्षाविषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने
यंदाही या सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षाविषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने, प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील शाळा आणि रहिवासी संकुलाच्या ठिकाणी अग्निसुरक्षेवरील व्याख्याने आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये प्राथमिक अवस्थेतील आग शमवण्याच्या पद्धती, फायर एक्टिंग्विशरचा वापर, स्वयंपाक घरातील गॅस गळती रोखण्याचे उपाय आदीची माहिती देण्यात येणार आहे. आग लागल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, १२५ शाळा आणि रहिवासी संकुल येथे अग्निसुरक्षेवरील व्याख्याने, तसेच प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक अवस्थेतील आग शमवण्याच्या पद्धती, फायर एक्टिंग्विशरचा वापर, स्वयंपाक घरातील गॅस गळती रोखण्याचे उपाय आदींची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणार आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटर, इएसआयसी रूग्णालय (कांदिवली), फोर्टिस रूग्णालय (मुलुंड), भाटिया रूग्णालय (ताडदेव), लोकमान्य टिळक रूग्णालय (शीव) आदी ठिकाणी प्रात्यक्षिके आणि रंगीत तालीम सादर करण्यात येणार आहे. मुंबईतील उंच इमारती, निवासी चाळी, व्यापारी संकुले यांसारख्या ठिकाणी भित्तिपत्रके प्रदर्शित करून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
अग्निकवायत स्पर्धेच्या अंतिम फेरी
वार्षिक अग्निकवायत स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन १८ एप्रिल रोजी भायखळा येथील प्रादेशिक समादेश केंद्रात करण्यात आले असून या कार्यक्रमा, भूषण गगराणी उपस्थित राहणार आहेत. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उपआयुक्त प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य देतानाच अद्ययावत अग्निशमन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आगीसारख्या घटनांमध्ये किमान कालावधीत प्रतिसाद देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आदेश गगराणी यांनी दिले आहेत. तसेच, शाळा, रुग्णालये, तसेच व्यापारी संकुल या ठिकाणी अधिकाधिक नागरिकांना अग्निसुरक्षेबाबतच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या सूचना डॉ. अमित सैनी यांनी केल्या.