मुंबई : स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुस्थितीत राहिले, तरच मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहील. यासाठी मुंबई महापालिकेतर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्याद्वारे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण होण्यास मदत मिळते. मुंबई स्वच्छ व सुंदर राखून, मुंबईकरांचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्याकामी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.
हेही वाचा >>> केंद्र सरकारकडून मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाविषयी राज्यांना सूचना
केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार, महानगरपालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा राबवण्यात येत आहे. यावर्षी ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेवर अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विभागनिहाय आरोग्य शिबीर भरवण्यात आले. त्यावेळी गगराणी बोलत होते. स्वच्छता कर्मचारी आपली जबाबदारी अविरतपणे व उत्तमरीत्या पार पडत असतात. जबाबदारी पार पाडत असताना बऱ्याच वेळा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मुंबई स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करणे, मार्गदर्शन व तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देणे, हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. जास्तीत जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच, आपल्या सहकाऱ्यांनाही या शिबिराचा लाभ घेण्याबाबत अवगत करावे, असे आवाहन देखील गगराणी यांनी केले.
हेही वाचा >>> कामा रुग्णालयात महिलांसाठी विशेष मूत्ररोगशास्त्र विभाग
ओला व सुका कचरा वर्गीकरण जनजागृती
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने, स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत विविध महाविद्यालयीन युवक – युवतींनी, शालेय विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी जनजागृती फेरी काढत सार्वजनिक स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाचा जागर केला. तसेच घरोघरी जाऊन ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत जनजागृती केली.