मुंबई : महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६ हजार १९८ कोटी ५ लाख रुपये इतक्या रकमेचे मालमत्ता कर संकलन करण्यात आले आहे. ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. ही कामगिरी बजावणारे करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच, या उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी हा छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, सह आयुक्त विश्वास शंकरवार, करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे आदी उपस्थित होते. महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ६ हजार २०० कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते.
करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने महानगरपालिकेने या आर्थिक वर्षात २६ मे २०२४ ते ३१ मार्च २०२५ या निर्धारित कालावधीदरम्यान ६ हजार १९८ कोटी ५ लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलन केले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ५० हजार रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.
मालमत्ता कर संकलनातील ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय विभाग स्तरावर उद्दिष्टापेक्षाही अधिक कर संकलन करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा आज गौरव करण्यात आला. यामध्ये सहायक कर निर्धारक व संकलक विवेक राऊळ (आर मध्य विभाग, ११७ टक्के), अनुप्रिया जाधव (सी विभाग, ११२.८१ टक्के), हृदयनाथ गोसावी (के पूर्व विभाग, ११२.८१ टक्के), राजू काठे (एफ उत्तर विभाग, ११२ टक्के), महेश साळगावकर (एन विभाग, १११.९३ टक्के), अशोक नाईक (एम पश्चिम विभाग, १११ टक्के), दत्तात्रय गिरी (एफ दक्षिण विभाग, ११०.८६ टक्के), उमाकांत वैष्णव (एम पूर्व विभाग, ११०.६१ टक्के), प्रसाद पेडणेकर (ए विभाग, १०६.६९ टक्के), अनिल साळगावकर (एल विभाग, १०५.०९ टक्के), सूर्यकांत गवळी (जी उत्तर विभाग, १०४.५३ टक्के), दीपक गायकवाड (एस विभाग, १०४.४५ टक्के), धर्मेंद्र लोहार (टी विभाग, १०१.३६ टक्के), संतोष ठाकूर (डी विभाग, १००.९१ टक्के), दिलीपकुमार साळुंखे (आर उत्तर विभाग, १००.८६ टक्के) यांचा समावेश होता.
याशिवाय, अन्य ९ सहायक करनिर्धारक व संकलकांना देखील प्रशस्तिपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. करनिर्धारण व संकलन विभागाच्या शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळेच विक्रमी कर संकलन होऊ शकले. महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची व्याप्ती ही अन्य महानगरपालिकांच्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षाही अधिक आहे.
मुंबईकर नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी हा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. त्यामुळे, कायदा आणि नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना त्रास न होता यापुढेही कर संकलनाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे करावी, असे आवाहन गगराणी यांनी केले. संरक्षणात्मक किंवा नकारात्मक भूमिका न घेता करनिर्धारण व संकलन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यंदा अत्यंत प्रभावीपणे मालमत्ता कर संकलनाचे कार्य केले. निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करू शकतो, हा विश्वासही सर्वांनी सार्थ ठरवला. त्यामुळे, प्रत्येक अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे, असे गौरवोद्गार जोशी यांनी काढले.