मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल हे केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी पात्र ठरले आहेत. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने सचिवपदासाठी पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात १९८८ च्या तुकडीतील राजीव जलोटा आणि १९८९ च्या तुकडीतील चहल या राज्याच्या सेवेतील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चहल हे सचिव समकक्ष पदासाठी पात्र ठरले आहेत. सचिव समकक्ष पदासाठी पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्याची केंद्रातील महत्त्वाच्या सचिवपदावर नियुक्ती केली जात नाही. राज्याच्या सेवेतील अरविंद सिंह, अपूर्व चंद्र आणि राजेश अगरवाल हे तीन सनदी अधिकारी केंद्र सरकारमध्ये सध्या सचिवपदावर कार्यरत आहेत.
इक्बाल सिंह चहल हे १९८९ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ८ मे २०२० साली त्यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी नगरविकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील काम केलं आहे. ते जलसंपदा विभागाचे सचिव म्हणूनही कार्यरत होते. धारावी झोपडपट्टीच्या विकासात चहल यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
यासोबतच ते औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. याशिवाय त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपद आणि उत्पादन शुल्क आयुक्त म्हणूनही काम केलं आहे. इक्बाल सिंह चहल यांनी करोना संसर्गाच्या काळात मुंबईतील स्थिती अंत्यंत संयमाने हाताळली आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने करोना विषाणूचा सर्वात जास्त धोका या शहराला होता. पण चहल यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेनं उत्कृष्ट काम केलं आहे. धारावी सारख्या झोपडपट्टीत देखील करोना विषाणूचा फैलाव रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आलं आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं देखील घेतली होती.