मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील निष्कासनाची कारवाई पुढेही सुरू ठेवावी, वीजेच्या अनधिकृत जोडण्या आढळून येताच त्या तातडीने खंडीत कराव्यात. तसेच, रेल्वे स्थानक परिसरातील कचरा निर्मूलन प्रभावीपणे करून परिसर स्वच्छ ठेवावा, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणांना दिले. दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करणे सोपे व्हावे, यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांच्या तुलनेत लहान आकाराची अतिक्रमण निर्मूलन वाहने घ्यावी, असे आदेश गगराणी यांनी दिले.

हेही वाचा >>> देवनारमधील दफनभूमीचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील निष्कासनाची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. महापालिकेने अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करून अनधिकृत फेरीवाले हटविले आहेत. याअनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भूषण गगराणी यांनी दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसराला सोमवारी दुपारी अचानक भेट देवून पाहणी केली.

हेही वाचा >>> मुंबई: अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून अत्याचार,आरोपीला अटक

मुंबईतील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, तसेच इतर अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार, अनधिकृत फेरीवाल्यांच्या निष्कासनाला वेग द्यावा, वर्दळीच्या परिसरांमध्ये अधिक नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेला असलेली बेवारस वाहने हटवावी, जेणेकरून नागरिक व वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे निर्देश भूषण गगराणी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले होते. याअनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात पोलीस प्रशासनासमवेत नुकतीच बैठक पार पडली. त्यानंतर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ठिकठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात निष्कासन कारवाई अधिक तीव्रतेने राबविण्यात येत आहे. गगराणी यांनी सोमवारी दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरातील सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालून ये – जा करण्यासाठी असणारे प्रवाशी मार्ग, गाळे, तसेच संलग्न असणारे एम. सी. जावळे मार्ग, डॉ. डिसिल्वा मार्ग, रानडे मार्ग आदी परिसरांमध्ये पाहणी केली. यावेळी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजीतकुमार आंबी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरकुटे यांच्यासह महानगरपालिकेचे, तसेच दादर पोलीस स्थानकातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.