स्त्रीयांच्या आंतर्वस्त्रांच्या जाहिरातींसाठी स्त्रीदेहाचे पुतळे बसविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणत्या नियमानुसार कारवाई करणार, याबाबत पालिका प्रशासनच संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे दुकानांच्या दर्शनी भागातील पुतळ्यांवर बंदी आणण्याची सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी बासनात जाणार असे संकेत मिळत आहेत.
‘सभ्यता’ आणि ‘असभ्यते’ची स्पष्ट व्याख्या पालिकेच्या नियमात नाही. त्यामुळे दुकानांच्या दर्शनी भागात मांडण्यात येणाऱ्या स्त्रीदेहाच्या पुतळ्यांविरुद्ध कारवाई करण्यास पालिका असमर्थ आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यास संबंधित दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
पालिकेकडून दुकानदारांना परवाना देताना नियमबाह्य कृती करू नये, असे त्यात स्पष्ट नमूद केलेले असते. मात्र कपडय़ांच्या प्रदर्शनासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंबाबत ‘सभ्य-असभ्यते’ची व्याख्या पालिकेच्या नियमात स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे ते योग्य की अयोग्य हे ठरविता येत नाही, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
यासाठी भारतीय दंड विधानाचा आधार घ्यावा लागेल. मात्र महापालिका नियमांमध्ये ‘सभ्य-असभ्यते’बाबत स्पष्टता नसल्याने पालिकेला कारवाई करता येणार नाही, असे ते म्हणाले.  मॉल्स, दुकाने, तसेच फेरीवाल्यांच्या स्टॉल्सवरील अंतरवस्त्रांच्या असभ्य प्रदर्शनाबाबत नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी. पोलिसांनी सर्व बाबी पडताळून संबंधित मॉल्स, दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यास पालिकाही त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल, असे ते म्हणाले.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचे स्वरुप पाहून संबंधित मॉल्स, दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यास प्रसंगी दुकानदाराचा परवानाही रद्द करण्यात येईल, असे सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात कायद्याच्या सर्व बाबी पडताळून पाहण्यात आल्या असून नगरसेवकांनी एकमताने पाठविलेल्या ठरावाच्या सूचनेला उत्तर तयार करण्यात आले आहे. लवकरच ते पालिका सभागृहात सादर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचे स्वरुप पाहून संबंधित मॉल्स, दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यास प्रसंगी दुकानदाराचा परवानाही रद्द करण्यात येईल, असे  कुंटे यांनी स्पष्ट केले.