मुंबई : गेल्या आठ दिवसांत मुंबई महापालिकेच्या यंत्रणेने मराठा आरक्षणासाठी एकूण ७० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. गेल्या आठ दिवसांत पालिकेच्या यंत्रणेने ३७ लाखांहून अधिक घरांना भेटी दिल्या आहेत. त्यापैकी २५ लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर सव्वासात लाखांहून अधिक घरे बंद असल्याचे आढळून आले आणि तर पावणेचार लाखांहून अधिक घरांतील रहिवाशांनी या सर्वेक्षणाला नकार दिला आहे. बुधवारी सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस असून एका दिवसात १ लाख ८० हजार घरांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांची ७५० पदे रिक्त, तत्काळ भरण्याची संघटनेची मागणी

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत मुंबईतही पालिकेच्या यंत्रणेमार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण हे सुरूच आहे. २३ ते ३१ जानेवारीदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर करण्यात येत असलेल्या व्यापक सर्वेक्षणातर्गत मुंबई महापालिकेचे ३० हजार कर्मचारी घरोघरी फिरून सर्वेक्षण करीत आहेत. बुधवारी या सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस आहे.

हेही वाचा >>> मुंबई : शिधावाटप दुकानातील तांदळाचा काळाबाजार करणारे तिघे अटकेत

दरम्यान, या सर्वेक्षणाला नकार देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अन्य धर्माचे लोक किंवा आरक्षणाला विरोध असलेले लोक या सर्वेक्षणाला विरोध करीत असल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच दीडशे प्रश्नांची उत्तरे देण्याइतका वेळ नाही म्हणून काही जणांनी नकार दिला. तर मराठा आंदोलन संपले असे सांगत काहींनी नकार दिला. दुपारी झोपेची वेळ असल्यामुळे अनेकांनी सर्वेक्षणाला नकार दिला. तर आम्हाला आमची माहिती जाहीर करायची नाही, असे सांगत काहींनी नकार दिल्याचे अनुभव कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेकांनी तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी विविध मुद्द्यांवरून वाद घातल्याचेही समाज माध्यमांवरील चित्रफितीतून दिसून आले आहे.

गेल्या आठ दिवसातील प्रगती

मुंबईतील एकूण घरे – सुमारे ३९ लाख

पालिकेच्या यंत्रणेने एकूण घरांना भेटी दिल्या – ३७लाख १ हजार २१ – (९५.४०टक्के)

घरे बंद आढळली- ७ लाख १८ हजार ७०८- (१९.४ टक्के)

सर्वेक्षणास नकार दिला – ३ लाख ८३ हजार ६९२- (१०.४ टक्के)

एकूण घरांचे सर्वेक्षण झाले – २५ लाख ९८ हजार ६२१ – (७०.२ टक्के)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc completed survey of percent of the houses for maratha reservation in eight days mumbai print news zws