गाळवाहू वाहनांवर व्हीटीएस; वजनकाटय़ांवर मुकादम तैनात
गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यातून उपसलेला गाळ वाहून नेण्यात झालेला घोटाळा उघडकीस आल्यामुळे यंदा पालिका प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गाळ वाहून नेणाऱ्या गाडय़ांवर करडी नजर ठेवली आहे. त्याचबरोबर मुंबईच्या वेशीवरील प्रत्येक वजनकाटय़ावर मुकादम तैनात करण्यात आले असून गाळ घेऊन मुंबई बाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत परतणाऱ्या गाडय़ांची वजनासह नोंदणी करण्यात येत आहे. घोटाळेबाज कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
मुंबईमधील छोटय़ा नाल्यांची सफाई पालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत करुन घेण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. मात्र मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात चार, पश्चिम उपनगरात १६, तर पूर्व उपनगरांमध्ये सहा मोठे नाले असून त्यांची लांबी सुमारे ३४० कि.मी. इतकी आहे. या नाल्यांच्या सफाईसाठी पालिकेने २६ कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी बहुतांश कंत्राटदरांची नियुक्ती करण्यातही आली आहे. काही कंत्राटदारांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी मोठय़ा नाल्यांमधून ३ लाख २५ हजार मे.टन, लहान नाल्यांतून २ लाख मे. टन, तर मिठी नदीतून १ लाख ८० हजार मे. टन गाळ उपसण्यात येणार आहे.
मोठय़ा नाल्यांतून उपसलेला गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘व्हेकल ट्रेकिंग’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा पालिका मुख्यालयातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील सव्र्हरला जोडण्यात आला आहे. त्यामुळे गाळ वाहून नेणारी वाहने नेमकी कुठे जातात याची इत्थंबूत माहिती पालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांना मिळणार आहे. गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामात घोटाळा झाल्यामुळे पालिकेने यंदा गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्या मार्गावरील वजनकाटय़ांवर पालिकेचा मुकादम तैनात करण्यात आले आहेत. दहिसर, वाशीमध्ये प्रत्येकी दोन, तर मुलुंड, एलबीएस येथे प्रत्येकी एक अशा सहा वजनकाटय़ांवर गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांचे वजन केले जात असून या वजनकाटय़ांच्या ठिकाणी पालिकेचे मुकादम तीन पाळ्यांमध्ये तैनात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा