मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत कधी जलवाहिनीला धक्का लागली की गळती दुरुस्ती करण्यासाठी संपूर्ण विभागातील पाणी पुरवठा बंद करावा लागतो. अशी वेळ मुंबईकरांवर वारंवार येऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने आता जमिनीलगतच्या मोठ्या जलवाहिनींऐवजी जलबोगदे बांधण्याचे ठरवले आहे. पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून ते मुलुंडपर्यंत २१ किमीचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याची एक समांतर यंत्रणा कार्यान्वित करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> एका भागाची स्वच्छता, दुसरी बाजू दुर्लक्षितच; पालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागाचा अजब कारभार

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंधेरी परिसरात जलवाहिनी फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव तब्बल तीन ते चार दिवस पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला होता. आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईत नागरिकांना चार दिवस पाण्याशिवाय काढावे लागले. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पाणी वाया जाते, नागरिकांना त्रास सोसावा लागतो व पालिकेवरही टीका होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेत आमुलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरात पाणी पुरवठ्यासाठी सध्या भल्यामोठ्या जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्या जमिनीवर आहेत. तर काही जलवाहिन्या या जमिनीखाली पण जमिनीलगत आहेत. या जलवाहिन्या सुरक्षित नाहीत. त्यामुळे पालिकेने या जलवाहिन्यांच्या आसपास सीसीटीव्ही यंत्रणाही उभारली आहे. मात्र त्याचबरोबर या जलवाहिन्यांना धक्का लागला की जलवाहिन्या फुटतात. असे होऊ नये म्हणून पालिकेच्या जल अभियंता विभागाने जलबोगदे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या अंतर्गत सध्या परळ ते अमरमहल आणि अमरमहल ते ट्रॉम्बे असा जलबोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातच आता पिसे पांजरापूर ते मुलुंडपर्यंत २१ किमीचा जलबोगदा तयार करण्याचे काम पालिका प्रशासन हाती घेणार आहे.

हेही वाचा >>> महालक्ष्मी सरस प्रदर्शनात यावर्षी २५ कोटींपर्यंत व्यवसाय होईल – गिरीश महाजन

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी सांगितले की, हे जलबोगदे जमिनीपासून सुमारे शंभर मीटर खाली असतील. त्यामुळे त्यांना धक्का लागण्याची शक्यता नाही. तसेच या जलबोगद्यांच्या जोडीने सध्याच्या जलवाहिन्यांची यंत्रणाही कार्यरत ठेवली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात कधी आवश्यकता भासल्यास एखादी यंत्रणा बंद पडल्यास दुसरी यंत्रणा सुरू राहील, असा प्रशासनाचा विचार आहे. तसेच हा जलबोगदा शहराच्या बाहेर बांधावा लागणार असल्यामुळे त्यात अडथळे कमी असतील व त्याला वेळ कमी लागेल असा अंदाजही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या जलबोगद्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कामासाठी साडे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc construct water tunnel from panjrapur water treatment plant to mulund mumbai print news zws